अकरावी प्रवेशासाठी दहा हजारांची लाच भोवली : मेहुणबारे विद्यालयातील दोघे शिक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात


भुसावळ (30 मे 2025) : अकरावी वर्गात प्रवेशासाठी शालेय फी व्यतिरिक्त दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गुलाब वीरभान साळुंखे (45, मेहुणबारे, ता.चाळीसगाव) व उल्हास भास्करराव बागुल (42, प्लॉट नंबर 9, आदर्श नगर, चाळीसगाव) अशी अटकेतील शिक्षकांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
42 वर्षीय तक्रारदार यांचा मुलगा हा गिरणा विद्या प्रसारक महामंडळाच्या मेहुणबारे विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला व त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश मिळवायचा असल्याने चौकशीसाठी तक्रारदार व त्यांचा मुलगा यांनी 27 मे रोजी उपशिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी संस्थेच्या सचिवांनी तसेच संचालकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशाकरता 20 हजार रुपये लागतील, असे सांगत दहा हजार ऑनलाईन अर्ज केल्यावर व उर्वरित 10 हजार रुपये शाळेत प्रवेश घेताना द्यावे लागतील, असे सांगत त्याशिवाय शाळेत प्रवेशाचे काम होणार नाही, असे सांगितले. तक्रारदाराने 28 मे रोजी धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 29 मे रोजी लाच पडताळणी करण्यात आली.





शिक्षक लाचेच्या जाळ्यात
शुक्रवारी सायंकाळी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेताना गुलाब साळुंखे यांना पकडण्यात आले व त्यानंतर लिपिकालाही अटक करण्यात आली. आरोपींविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

लाच कुणाच्या घशात ? संस्था चालकांच्या वाढल्या अडचणी
मूळात अकरावी प्रवेशासाठी 110 रुपये ऑनलाईन फी असून तक्रारदाराने ती भरलीदेखील आहे शिवाय अकरावी प्रवेशाची प्रक्रिया शासनानेच ऑनलाईन निश्चित केल्यानंतर संबंधित शाळेत कोणत्या अधिकाराने रक्कम मागण्यात आली? हे मोठे कोडेच आहे. लाच घेताना पकडण्यात आलेले शिक्षक हे निमित्तमात्र असलेतरी या प्रकारामुळे आता संस्था चालकांसह संबंधिताच्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या अ‍ॅडमिशन तसेच ऑनलाईन झालेले व्यवहार आता एसीबीच्या रडारवर असून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात हवालदार राजन कदम, हवालदार संतोष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !