जळगाव पोलिस दलातील 27 अधिकार्यांच्या बदल्या : जाणून घ्या जिल्ह्यात कोण बदलून येणार !

Transfers of 27 officers in Jalgaon Police Force : Know who will be transferred in the district! जळगाव (1 जून 2025) : विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलिस दलातील 12 पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदली केल्यानंतर आता पुन्हा जळगाव जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांसह पाच सहायक पोलिस निरीक्षक व 19 उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या विनंती बदल्यांसह कार्यकाळ पूर्ण झालेल्या नवीन अधिकार्यांच्या बदलीचेही आदेश काढण्यात आले. बदली झालेल्या निरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. बदली ठिकाणी वेळेत हजर न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अधिकार्यांच्या बदल्या
अहिल्यानगर येथून पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, धुळे येथून शशिकांत पाटील, नंदुरबार येथून संदीप उत्तमराव पाटील यांची जळगावात बदली करण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण येथून सहायक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ आखेगावकर यांची जळगावात विनंती बदली करण्यात आली आहे. तर 10 नवीन पोलिस उपनिरीक्षक जळगावात येणार आहेत.
12 विनंती तर सात नियमित बदल्या
सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र शिखरे यांची अहिल्यानगर, सागर कोते, संतोष चव्हाण यांची नाशिक ग्रामीण, जगदीश गावित, संदीप वाघ यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंती तर सात उपनिरीक्षकांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पाच उपनिरीक्षकांना मुदतवाढ देण्यात आली.
चाळीसगावचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नुकतीच नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची अहिल्यानगर येथे विनंती बदली करण्यात आली आहे. या सोबतच पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांची नाशिक ग्रामीण येथे तर पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.
