यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासह अतिक्रमण काढण्याची मागणी


यावल (1 जून 2025) : यावल नगरपालिकेत मनसेकडून निवेदन देण्यात आले व शहरात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा तसेच शहरातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने ते काढण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

अशा आहेत मागण्या
यावल नगरपरिषदेत मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे मनसेचे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. पाणीपुरवठा यावल शहरात सुरळीत करावा व पाणीपुरवठा संदर्भात जी काही समस्या असेल ती तत्काळ आपल्या स्तरावर मार्गी लावावी व पाणीपुरवठा करणार्‍या कंत्राटदाराकडे लागलेल्या कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे त्यांनी संप पुकारल्याने त्यांचे जे काही महिन्यांचे पगार थकीत बाकी असतील ती तत्काळ देणी करावी व यावलकरांचा पाणीपुरवठा हा सुरळीत व्हावा तसेच यावल शहरातील आठवडे बाजार हा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर भरला जातो मात्र त्या ठिकाणी मोठे अवजड वाहन हे ये-जा करतात व त्यांना जाण्यासाठी खुप कसरत करावी लागते. महिला मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी येत असतात, भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे नगरपरिषदेच्या आतल्या जागेत भरत होता व आहे. आजु-बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण काढल्यास रोडवरील बाजार हा तिथे बसण्यास जागा मोकळी होऊ शकते व तसा अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयाने निकाल सुद्धा दिला आहे. आजपावेतो कोणतीही कार्यवाही झालेली नाही व यावल शहरात महिलांसाठी प्रसाधन गृह व शौचालय अस्तित्वात नाही. बाजारात येणार्‍या महिलांसाठी व नागरिकांसाठी ही सुविधा आपण नगर परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास महाराष्ट्र निवनिर्माण सेनेमार्फत नागरीक व महिलांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देतेप्रसंगी मनसे शहराध्यक्ष गौरव कोळी, तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष शाम पवारसह आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !