पाल वनसफारीच्या धर्तीवर ‘हतूनर’चे करणार ‘बर्डिंग अॅण्ड नेचर टुरिझम हब’
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मनोदय, पक्षी निरीक्षणाचा लुटला आनंद
‘Hatunar’ to be turned into a ‘Birding and Nature Tourism Hub’ on the lines of Pal Vansafari भुसावळ (1 जून 2025) : पाल येथील वनसफारीच्या धर्तीवर ‘बर्डिंग अॅण्ड नेचर टुरिझम हब’ म्हणून हतनूर परिसर विकसीत करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. परिसरात यानिमित्ताने रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. पक्षी संवर्धनाला संस्थात्मक पाठबळ दिले जाईल. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण लवकरच या कार्यक्रमाची दिशा ठरवू, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेसोबत हतनूर जलाशयावर पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी वरिलप्रमाणे मनोदय बोलून दाखवला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मित्रांसमवेत हतनूर जलाशय गाठले. हा उपक्रम स्थानिक जैवविविधतेची माहिती घेण्यासाठी तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आयोजित केला होता. या दौर्यात विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. परिसंस्थेचे महत्त्व आणि संवर्धनाच्या गरजांवर चर्चा झाली.


चातक संस्थेच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्यांना स्थानिक पक्षी, स्थलांतर करून येणार्या पक्षी प्रजातींची माहिती दिली. संवेदनशील भागात होणार्या बदलांवर लक्ष वेधले. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत निसर्ग संवर्धनासाठी प्रशासनाकडून शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा उपक्रम पर्यावरणीय जाणीव वाढवण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला. पक्षी अभ्यासक तथा चातकचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, सौरभ महाजन, पीयूष महाजन उपस्थित होते.
पर्यावरणीय पर्यटनाला चालना देणार
वन विभाग, सिंचन विभाग व संवर्धन उत्साही गटांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत पर्यावरणीय पर्यटनाला चालना देणार, असे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जलाशयालगत पक्ष्यांच्या 310 वर प्रजाती
हतनूर जलाशयावर विविध 310 पेक्षा जास्त पक्षी प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती ऐकून जिल्हाधिकारी अवाक झाले. हतनूर जलाशय पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे जलाशय असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.





