मुक्ताईनगर अपघातातील दोघा मृतांसह 32 जखमींची ओळख पटली : वाचा सविस्तर बातमी

नादुरुस्त ट्रकवर लक्झरी आदळताच चालक-वाहक जागीच : कोथळी उड्डाण पुलावर पहाटे भीषण अपघात : 32 प्रवासी जखमी


भुसावळ (5 जून 2025) : सुरतहून बुलढाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली लक्झरी भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावरील कोथळी गावाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात लक्झरी चालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू झाला तर वाहनातील 32 प्रवासी गंभीर जखमी झाले. बुधवार, 4 जून रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली.

जागीच दोघांचा मृत्यू
अपघातग्रस्त लक्झरी ही सिहोरी ट्रॅव्हल्स कंपनीची असून सुरत येथून बुलढाणा जात होती. अपघातात चालक देवीलाल पन्नालाल लोहार (38, रा.सुरत) व वाहक भगवतीलाल रेवा शंकर (25, रा.उदयपूर, राजस्थान) यांचा जागीच मृत्यू झाला.




32 प्रवासी जखमी
जखमी 32 प्रवाश्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर चिखली तालुका तसेच सुरतच्या प्रवाशांचा समावेश आहे. लता शालिग्राम देवघामे (49, रा.वरवंड, जि.बुलढाणा), शालिग्राम रामराव देवघामे (60, रा.वरखंड, जि.बुलढाणा), ऋषिकेश शालिग्राम देवघामे (30, रा.वरखंड, जि.बुलढाणा), जयसिंग शिरसाठ (70 रा. दादुलगव्हाण, मेहकर), राधाबाई जयसिंग शिरसाठ (60, रा. दादुलगव्हाण, मेहकर), आनंदा जंगलु शिरसाठ (24, रा.दादुलगव्हाण मेहकर), गजमल हिंमतराव आढाव (42, रा.लासुरा, जि.बुलढाणा), वर्षा गजमल आढाव (42, रा.लासुरा, जि.बुलढाणा), मो.अफरोज मो. युनुस (39, रोहिणखेड, जि.बुलढाणा), कैलास धनराज गुजर (52, रा.रोहिणखेड, जि.बुलढाणा), सलीमा बी शे.सुपडु (45 रा. ढोणगांव), सानिया परवीन शेख फिरोज (19, रा.ढोणगांव), जयश्री विजय मोरे (20, रा.बंडारी सोदखेड), रामेश्वर आनंदा काळे (42, रा.शेणगांव, हिंगोली), अनुमुद्रा रामेश्वर काळे (24, रा.काहकर, जि.बुलढाणा), अष्टविनायक रामेश्वर काळे (08, काहकर, जि.बुलढाणा), आवेश शहा बशीर शहा (16, रा.मोताळा, जि.बुलढाणा), जयनुर बी.हमीद शहा (60, रा.मोताळा, जि.बुलढाणा), बब्बू शहा रहेमान शहा (57, रा. बुलढाणा), गोविंदा अंबादास गुंड (30, रा.चिखली), उषाबाई संतोष तायडे (59, रा.रुईखेड मायंबा, जि. बुलढाणा), उदय देविदास शेळके (41, रा.सारोळा पि.), शेख फिरोज मुस्ताक (42, रा.सुरत), शबाना बी शे. फिरोज (36, रा.सुरत), सानिया परवीन (20, बुलढाणा), आदिल शेख बशीर (17, रा.बुलढाणा), कल्याणी गजानन तायडे (7, बुलढाणा), इशिता राजेश वानखेडे (10), आराध्या राजेश वानखेडे (6), समाधान भीमराव बोरकर (33) यांचा समावेश आहे.

उभ्या ट्रकवर बस आदळली
सुरत येथून मेहकर-बुलढाणासाठी निघालेची सिहोर ट्रॅव्हल्स (क्रमांक एआर.20-9595) ने महामार्गांवर कोथळी ते सालबर्डी फाट्यादरम्यान ओव्हर ब्रिजवर साईडवर उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक आर.जे. 09 जी.बी.3249) ला मागून जोरदार धडक दिली. जोरदार धडकेमुळे ट्रॅव्हल्सची कॅबीन ट्रकच्या एका बाजूने आठ ते दहा फूट घासली गेल्याने मोठे नुकसान होवून चालक व वाहक जागीच ठार झाले.

पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. कोथळी, सालबर्डी आणि मुक्ताईनगर येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. अपघात इतका भीषण होता की, लक्झरी बसचा दर्शनी भाग चेंदामेंदा झाला होता तर चालकाचा मृतदेह क्रेन बोलावून बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी रुग्णवाहिका व खाजगी वाहनातून जखमी प्रवाशांना उप जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर जखमी रुग्णांना जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले तर काही जखमीना सोयीनुसार बुलढाणा जिल्ह्यात हालविण्यात आले आहे.

शिवसैनिकांचे पोलीस ठाण्यात आंदोलन
बुधवारी पहाटे झालेल्या अपघात ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरवाडे यांनी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेत चार अपघातग्रस्त व्यक्ती असताना अजून एक दोन अपघात ग्रस्त व्यक्तीला घेऊन जा, असे म्हटले असता रुग्णवाहिका चालकाने दुसर्‍या रुग्णवाहिकेत न्या, असे सांगितल्यानंतर पोलीस सुरवाडे यांनी रुग्णवाहिकेला आग लावा, असे म्हटले. या वक्तव्याचा शिवसैनिकांतर्फे निषेध करण्यात आला व मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आवारात आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, गणेश टोंगे, अफसर खान, पंकज राणे, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक निलेश शिरसाठ, पियुष महाजन, प्रफुल्ल पाटील, तानाजी पाटील, विजय काळे, भैय्या श्रीखंडे, शुभम तळेले, हर्षल माळी, गणेश पाटील, अनिल तळेले, दीपक खुळे आदी शिवसैनिकांनी तब्बल तीन तास सायरन बजाव आंदोलन केले. यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे हादरून गेले. काही वेळेनंतर संबंधित पोलीस कॉन्स्टेबल सुरवाडे यांनी समोर येऊन मी तसे बोललेलो नाही, सहा वर्षाची मुलगी ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णवाहिकेत घेवून जावे, अशी आपली तळमळ होती मात्र काही गैरसमज झाला असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शिवसैनिकांची मदतीसाठी तत्परता
आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी संपूर्ण शिवसैनिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर प्रवीण चौधरी यांच्यासह रुग्णवाहिका घेऊन सर्व शिवसैनिक अपघातस्थळी मदतीसाठी धावून आले. सालबर्डी येथील आणि शेजारील गावकरी सुद्धा मदतीसाठी धावून आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !