पाचोरा तालुका हादरला : 85 वर्षीय वृद्धेचा डोक्यात रॉड मारून खून
Pachora taluka shaken : 85-year-old man murdered by hitting him in the head with a rod पाचोरा (6 जून 2025) : 85 वयोवृद्धेचा डोक्यात रॉड मारून खून करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वाडी गावाजवळील शेवाळे येथे घडली. जनाबाई माहरु पाटील (85, शेवाळे) असे मृताच नाव आहे. वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या लांबवण्यात आल्या आहेत.
सोन्याच्या दागिण्यांसाठी खूनाचा संशय
जनाबाई पाटील या शेवाळे येथील त्यांच्या मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर, त्यांना आपली आई झोपलेल्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली. अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याचे तसेच गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत आणि कानातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या ओरबाडून चोरट्यांनी वृद्ध महिलेला पलंगाखाली टाकून तिच्यावर अंथरूण पांघरूण टाकल्याचे दिसून आले.
पोलिस अधिकार्यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉडने गावातच सुगावा काढल्याने, वृद्ध महिलेचा मारेकरी हा गावातीलच असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णराव पाटील बाहेरगावी गेल्याची खबर लागल्याने रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.




