भुसावळात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी


भुसावळ (12 जुन 2025) : शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरातील रहिवासी चेतन चंद्रमणी शिंदे यांच्या आई व बहीण हे दुपारी १२ वाजता रेल्वे हाॅस्पीटलमध्ये तपासणी करायला गेले हाेते, ते तेथून परत १.३० वाजता आल्यावर त्याच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यावर बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त फेकले हाेते. अवघ्या दिड तासाच्या कालावधीत चाेरट्यांनी १ लाख ८७ हजार ५०० रूपये कींमतीचे साेन्याचे दागिणे लांबविल्याची घटना मंगळवार, १० जून राेजी घडली. भरदिवसा झालेल्या धक्कादायक घरफोडीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. शहर पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल केला आहे.

चेतन चंद्रमनी शिंदे (वय २५) हे आपल्या कुटुंबासह नॉर्थ कॉलनी, येथे राहतात. ते संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१० जून) रोजी सकाळी ८ वाजता चेतन व त्यांचे वडील कामावर गेले, तर आई व लहान बहीण नेहा या रेल्वे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेल्या. घराला कुलूप लावून त्या दुपारी १२ वाजता बाहेर पडल्या होत्या. दुपारी १.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले. घरात प्रवेश करताच बेडरूम व किचनमधील कपाटे उघडून संपूर्ण घर अस्ताव्यस्त करण्यात आले होते. कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले साेन्याचे दागिणे चाेरट्यांनी लांबविले.

असा गेला ऐवज
३ तोळे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ७५ हजार), १ तोळ्याचा डिझाईन नेकलेस (२५ हजार), १ तोळ्याचे झुमके (२५ हजार), ५ ग्रॅमचे सोन्याचे टॅप्स (१२ हजार५००), ४ ग्रॅमची काळ्या मण्यांची पोत (१० हजार), अर्धा किलो चांदीची कडे-पाटली ४० हजार रूपये एकूण १ लाख ८७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लांबवला.

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. याशिवाय श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांची मदत घेतली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लागेल, असा विश्वास पाेलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी व्यक्त केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !