अहमदाबाद विमान अपघात : 265 नागरिकांचा मृत्यू


Ahmedabad plane crash: 265 civilians killed अहमदाबाद (13 जून 2025) : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्यानंतर विमानातून 242 पैकी केवळ एक प्रवासी बचावला असून अन्य 241 प्रवाशांचा मृत्यू ओढवला आहे तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर गुरुवारी दुपारी अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू ओढवला.

पंतप्रधान गुजररातमध्ये
विमान अपघातानंतर शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. अपघाताची कारणं, झालेलं नुकसान याची माहिती नरेंद्र मोदींनी घेतली. पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अधिकार्‍यांना सूचनाही दिल्या. विमान अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात देखील गेले. यावेळी अपघातातील जखमींची नरेंद्र मोदींनी विचारपूस केली.

प्रियजन गमावलेल्यांच्या सोबत आमच्याही संवेदना : पीएम
विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद आहे. मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांना आणि अधिकार्‍यांना भेटलो, जे सतत कठोर परिश्रम करत आहेत. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत, असल्याचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे.

मोदी म्हणाले की, या विमान अपघाताने आपण सर्वजण खूप दुःखी आणि स्तब्ध झालो आहोत. इतक्या लोकांच्या अचानक आणि हृदयद्रावक मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. आम्हाला त्यांचे दुःख समजते आणि आम्हाला माहिती आहे की या अपघातामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अनेक वर्षे लागतील. रुग्णालयात नरेंद्र मोदी जवळपास 10 मिनिटे उपस्थित होते.

गुजरातमध्ये विमान अपघात, शाहबाज शरीफ यांचं ट्विट
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्सवर ट्विट करुन दुःख व्यक्त केलं आहे. अहमदाबादजवळ एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताने दुःख झाले. या प्रचंड नुकसानीबद्दल आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करतो. कुटुंबातील व्यक्तींना गमावणार्‍या लोकांसोबत आम्ही आहोत. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.

विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !