भुसावळातील कुली बांधवांना हव्यात 15 ट्रॉली बॅग
रेल्वे कुली संघाची मागणी : धोरणांची अंमलबजावणीसह ट्रॉलींचे वितरण करण्याची अपेक्षा

भुसावळ (13 जून 2025) : ऑल इंडिया रेलवे लाल वर्दी कुली युनियन, भुसावळ स्टेशन शाखेतर्फे भुसावळ विभागाचे सिनियर डीसीएम यांच्याकडे निवेदन देत रेल्वे बोर्डाने कुली बांधवांच्या हितासाठी ज्या विविध योजना आणि धोरणांची अंमलबजावणी केली आहे, ती प्रत्यक्षात राबवली जावी, अशी मागणी केली आहे.
युनियनचे मंडळ अध्यक्ष अनिल सावे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, रेल्वे प्रशासनाकडून कुलींना रेल्वे कर्मचार्यांसारखी वैद्यकीय सुविधा जाहीर करण्यात आली मात्र, प्रत्यक्षात आम्हाला केवळ ओपीडीची सुविधा मिळते आणि आमच्या कुटुंबीयांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही. ही बाब अन्यायकारक आहे. नेपाल बस अपघातप्रसंगी कुली बांधवांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत प्रवाशांचे सामान मोफत वाहून नेले. अशा कठीण प्रसंगी ट्रॉलीची मोठी कमतरता जाणवली.

सध्या 50 कुलींसाठी केवळ सहा ट्रॉली उपलब्ध आहेत त्यामुळे किमान 15 नव्या ट्रॉली तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. कुली संघटनेची मागणी विचाराधीन असावी, कुली बांधवांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युनियनचे विभागीय अध्यक्ष अनिल सावळे, तारीक कुरेशी, श्रीकांत ठाकूर, रफिक शेख, अबरार शेख आदी उपस्थित होते.
