स्थानिकांना रोजगार द्यावा ; अन्यथा मनसेचा आक्रोश

विनोद पाठक यांचे दीपनगर प्रकल्प प्रशासनाला निवेदन


भुसावळ (13 जून 2025) : दीपनगरातील 660 मेगावॅट नव्या प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांनी केली आहे. त्यांनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देत स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, नव्या प्रकल्पात कामे देताना जुनेच ठेकेदार व अधिकार्‍यांमधील साठगांठ सुरू आहे. त्यामुळे नवोदित तरुण उद्योजकांना संधी मिळत नाही. कामाचे कोड तयार करताना पारदर्शकता ठेवावी, जेणेकरून लहान ठेकेदारांनाही संधी मिळेल. अन्यथा या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाठक यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील दिपनगर प्रकल्पात कंडारी, वेल्हाळा, कुन्हा आणि भुसावळ परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगारात संधी मिळाली पाहिजे.


मागील आंदोलने लक्षात घेता, भविष्यात आणखी आक्रमक आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मनसे भुसावळ शाखेने या मुद्यावर पूर्वीही आंदोलने केली असून, यावेळी लोकशाही मार्गाने निवेदन देत आहे. तरीही प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास पुढील आंदोलनास प्रकल्प प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !