भुसावळ महामार्गावरील सर्व्हिस रोडवर राखेची बल्कर उभे करण्यास बंदी
वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

जळगाव (14 जून 2025) : भुसावळ शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहून नेणार्या बल्कर वाहनांची गर्दी असल्याने महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने सर्व्हिस रोडवर बल्कर उभे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्गावर वाहतूक कोंडी व रस्ता सुरक्षेच्या प्रश्नाकर आयोजित बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर निर्माण होणार्या वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते.

बैठकीत या निर्णयांना मंजुरी
सर्व्हिस रस्त्यावर बल्कर उभे करण्यास मनाई
राख वाहतुकीसाठी नियोजित वेळापत्रक तयार करणे
वाहतूक पोलिस व प्रकल्प सुरक्षा यांच्यात समन्वय
अपघात टाळण्यासाठी सीसीटीव्ही, संकेतचिन्हे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक
नागरिकांच्या जीवाला प्राधान्य द्यावे
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रस्ता सुरक्षा आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे प्राधान्याचं आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी यावर गंभीरपणे काम करावे.
बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे अधिकारी आणि औष्णिक प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
