भुसावळात धाडसी घरफोडी : 58 हजारांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Bhusawal: Property worth Rs 58 thousand looted भुसावळ (16 जून 2025) : शहरातील रामदास वाडी, खडका रोडवरील फिरदोस चिकन सेंटरमागील सेवानिवृत्ताच्या बंद घरात चोरट्यांनी घरफोडी करीत 58 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
राजाराम बळीराम राणे (79) हे येथील रामदास वाडी परिसरात राहतात. 4 जून रोजी सकाळी आठ वाजता बाहेरगावी गेल्यानंतर या दिवसापासून ते 8 जून रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील खिडकीची आसारी वाकवून अनधिकृतरित्या घरात प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरून नेली.


चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये डायकिंन कंपनीचा एसी कंप्रेसर (सहा हजार), अरिहंत कंपनीचा कुलर (2,500 रुपये), टेक्समो कंपनीची पाण्याची मोटर (2,500), तांब्याची भांडी (500 रुपये) तसेच 16 हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 12 हजारांचे सोन्याचे लॉकीट, आठ हजारांची कानातील सोन्याची साखळी, आठ हजारांची दोन कर्णफुले आणि रोख तीन हजार रुपये चिल्लर स्वरूपात असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आहे. या सर्व सोन्याच्या वस्तू अंदाजे 60 वर्षांपूर्वी घेतलेल्या व वापरात असलेल्या आहेत.

या प्रकरणी 14 जून रोजी दुपारी 1.05 वाजता गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहे. पोलिसांनी गुन्ह्यात तपास सुरू केला आहे. या भागातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. लवकरच संशयीतांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस निरीक्षक वाघ यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !