रिंगणगावच्या अल्पवयीन बालकाचा खून : दोघा आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

धक्का लागल्याच्या वादातून अल्पवयीनाचा नराधमांनी केला खून


Murder of minor boy from Ringangaon: Two accused arrested by Crime Branch जळगाव (18 जून 2025) : रस्त्यात चालताना धक्का लागल्याच्या वादातून निष्पान 14 वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची घटना एरंडोल तालुक्यातील रिंगणगावात घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. जिल्ह्यात गाजत असलेल्या या खून प्रकरणाची उकल करण्यात जळगाव गुन्हे शाखेला अखेर शयश आले आहे. तेजस गजानन महाजन (14, रिंगणगाव) असे खून झालेल्या निष्पाप बालकाचे नाव आहे.

हरदास ढेमश्या वास्कले (28, रा.नांदीया, ता.भगवानपूरा, खरगोन, मध्यप्रदेश) व सुरेश नकला खरते (35, धोपा, ता.झिरण्या, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींना न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर रिचडिया कटोले हा पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.


बेपत्ता बालकाचा मृतदेहच आढळला
रिंगणगाव येथील रहिवासी गजानन नामदेव महाजन यांनी त्यांचा मुलगा तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार एरंडोल पोलीस ठाण्यात 16 रोजी दिल्यानंतर तपास सुरू असताना रिंगणगाव खर्चे रोडजवळील एका पडक्या शेतात दुसर्‍या दिवशी काटेरी झाडाझुडपांमध्ये तेजसचा मृतदेह आढळला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
अल्पवयीनाचा खून झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि त्यांनी रास्ता रोको तसेच महामार्गावर निदर्शने करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. आरोपींनी खुनाच्या वेळी कोणताही पुरावा ठेवला नसून त्यांना कोणीही पाहिले नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते.

पोलिसांचा संशय ठरला खरा
जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन एरंडोल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. एरंडोल पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी तेजस महाजन सायंकाळी कोणासोबत होता, याचा शोध सुरू केला. रिंगणगावात सायंकाळी 5 वाजल्यापासून बाजार असल्याने, सायंकाळी सात वाजता तेजस हा खर्चे रोडकडे जाताना दिसला होता. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला फिरणार्‍या सर्व संशयितांची चौकशी करण्यात आलीपरंतु काहीही निष्पन्न झाले नाही.

पोलीस पथकाने तेजसचा मृतदेह ज्या शेतात सापडला, त्यापासून 50 फूट अंतरावर राहणार्‍या आणि मध्यप्रदेशातील खरगोण परिसरातून शेतीकामासाठी आलेल्या काही कुटुंबांची चौकशी सुरू केली.

चौकशीअंती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, तेथे वास्तव्यास असलेले हरदास वास्कले (रा.नांदीया, ता. भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हा पत्नी समिता आणि मुलांसोबत तर त्याचा शेजारी सुरेश खरते (रा.धोपा, ता.झिरण्या, जि.खरगोन, मध्यप्रदेश) हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सकाळीच दुचाकीवरून रवाना झाले आहेत. पेरणीचे दिवस असताना मालकांना न सांगता हे संशयित निघून गेल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.

या माहितीनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकाची तीन पथके रवाना करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले गौरव पाटील यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरदास वास्कलेचा शोध घेतला असता, तो फैजपूर-रावेर मार्गे जात असल्याचे दिसून आले. तात्काळ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी लावण्याचे आदेश फैजपूर आणि रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आले.

नाकाबंदी करून शिताफीने अटक आणि कबुली
फैजपूर येथील सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी भुसावळ-फैजपूर येथे नाकाबंदी लावली असत संशयित हरदास ढेमश्या वास्कले (28, रा.खरगोन, मध्यप्रदेश) मोटारसायकलवर येताना दिसला. त्याला पळण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्यासोबतच्या पोना श्रीकृष्ण देशमुख, सफौ रवी नरवाडे, हवालदार संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, हवालदार महेश सोमवंशी या कर्मचार्‍यांनी हरदास वास्कलेची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

धक्का लागल्याचे निमित्त
हरदासने सांगितले की, त्याचा शेजारी सुरेश खरते आणि गावातील रिचडिया कटोले हे तिघे गावात फिरत असताना, समोरून येणार्‍या मयत तेजस महाजनला सुरेश वास्कलेचा धक्का लागला. यावरून सुरेश वास्कलेने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. तेजस विरोध करत असताना तिघांनी त्याला मारहाण केली आणि रिचडिया कटोलेने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करून ठार केले. कोणीही आपल्याला पाहिले नाही असे पाहून तिघांनी तेजसला उचलून सुरेशने खांद्यावर घेऊन आडमार्गाने त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झाडा-झुडपांमध्ये नेऊन ठेवले. त्यांनी हा प्रकार कोणालाही न सांगता कमालीची गुप्तता पाळली.

दुसर्‍या आरोपीला अटक
हरदासच्या कबुलीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, विष्णु बिर्‍हाडे, संदीप पाटील, प्रवीण मांडूळे, राहुल कोळी, किशोर पाटील, प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, दामोदरे, रविंद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सुरेश नकला खरते (35, धोपा, ता.झिरण्या, मध्यप्रदेश) याचा शोध घेतला. त्याला धुपा, ता. झिरण्या, जि.खरगोण, मध्यप्रदेश येथून डोंगरवस्तीतून भंगारघाटी धुपा गावी जवळपास 10 किमी पायी जाऊन ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींची एकत्रित चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचा तिसरा साथीदार रिचडिया कटोले याचा शोध घेण्यासाठी सहा.निरीक्षक डोमाळे आणि कर्मचार्‍यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !