किनगावावातील ‘हॉटेल मनमंदिर’मध्ये वेश्या व्यवसाय उघड : तिघांविरोधात गुन्हा

Prostitution business exposed in ‘Hotel Manmandir’ in Kingawa: Crime against three यावल (20 जून 2025) : यावल तालुक्यातील किनगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर परमिट रूम व लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. 30 वर्षीय वेश्या व्यवसाय करणार्या महिलेची सुटका करण्यात आली तर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
किनगाव गावाबाहेर यावल रस्त्यावर हॉटेल मनमंदिर परमिटरूम व लॉजींग आहे. येथे अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यांनी येथे बनावट ग्राहक तयार करून या प्रकरणाची पडताळणी करण्याकरीता पथक तयार केलेे. यात हवालदार वासुदेव मराठे, पोलिस नाईक अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी,भरत कोळी, महिला पोलिस कर्मचारी मीनाक्षी तडवी, अलाऊद्दीन तडवी यांचा समावेश होता. या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवत रंगेहात येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.
एका 30 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात पोलिस हवालदार वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (28, रा.दहिगाव), पराग प्रकाश लोहार (24, रा. खेडी खुर्द ता.जळगाव) व समाधान शालिक तायडे (22, रा.साकळी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.
