दोन हजारांची लाच भोवली : तामथरे मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

Dhule ACB catches a board officer while taking a bribe of Rs. 2,000 धुळे (20 जून 2025) : प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळण्यासाठी आलेल्या अर्ज चौकशीचा अहवाल तहसीलदारांना देण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील तामथरे मंडळाधिकार्याला धुळे एसीबीने अटक केली. ही कारवाई शुक्रवार, 20 रोजी सायंकाळी करण्यात आली. छोटू महादू पाटील (54, रा.प्लॉट. नं.31/ब, गीता नगर, देवपूर) असे अटकेतील मंडळाधिकार्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे मौजे सोंडले, ता.जि.धुळे येथील शेतजमीन सुलवाडे जामफळ प्रकल्पात संपादित केल्याने तक्रारदाराने प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्याकरीता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) धुळे यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2025 रोजी अर्ज केला होता. हाअर्ज चौकशीकरिता तहसीलदार शिंदखेडा यांच्यामार्फतीने मंडळाधिकारी छोटू पाटील यांच्याकडे देण्यात आला. तक्रारदाराने बुधवार, 18 जून रोजी मंडळाधिकार्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती दोन हजारांची लाच मागण्यात आली व याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. गुरुवार, 19 रोजी लाच पडताळणी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारतास आरोपीस अटक करण्यात आली. मंडळाधिकार्याविरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, मुकेश अहिरे, कॉन्स्टेबल रामदास बारेला, चालक हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.
