कंडारीतील बिअरबारला विरोध : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा


Opposition to beer bar in Kandari: March on State Excise Office भुसावळ (20 जून 2025) : भुसावळ तालुक्यातील कंडारी वॉर्ड क्रमांक 5 येथे नवीन बिअर बार आणि दारू दुकानाला दिलेल्या परवान्यांविरोधात नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, दारूबंदी कराच्या घोषणा देत दारूबंदी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. दारूबंदी झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता तर पुरुषही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसरातील अवैध दारूचे व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी केली.

परवाना रद्द करण्याची मागणी
राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले.. आंदोलकांनी विभागीय अधिकार्‍यांकडे कंडारी वॉर्ड क्रमांक 5 मधील नवीन बिअर बार व दारू दुकानाचा परवाना रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, कंडारी वॉर्ड क्रमांक 5 मध्ये आधीच चार बिअर बार आणि वाईन शॉप्स आहेत. नवीन दुकानांमुळे परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे.

आंदोलकांनी दावा केला आहे की, ग्रामपंचायत अधिकार्‍यांनी यापूर्वीच लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणालाही नवीन बिअर बार किंवा दारू दुकानासाठी परवानगी दिलेली नाही त्यामुळे संबंधित मालकांनी खोटी कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीची एक प्रतही या अर्जासोबत जोडण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

निवेदनावर स्वाक्षरी करणारे प्रमुख आंदोलकांमध्ये महेश पटेल, गोकुळ भटकर, अरूण कुळकर्णी, मयुर सपकाळ, दीपक निकम आदी उपस्थित होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदोलकांनी दिला आहे. राज्य उत्पादनचे विभागाचे विभागीय निरीक्षक रमेश राठोड यांनी सांगितले की, आलेल्या तक्रारीची संपूर्ण शहानिशा केली जाईल, अवैध असल्यास नक्कीच कारवाई कायद्याने करण्यात येईल.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !