फैजपूर शहरातील 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या : तिघांविरुद्ध गुन्हा

Suicide of 19-year-old married woman in Faizpur city : Case filed against three यावल (20 जून 2025) : यावल तालुक्यातील फैजपूर शहरात इस्लामपुरा भागात एका 19 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना बुधवार, 18 जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुरुवारी फैजपूर पोलीस ठाण्यात विवाहितेला माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात आला व या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली म्हणून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
फैजपूर, ता.यावल या शहरात इस्लामपुरा भागातील रहिवासी आरिफाबी जुबेर शेख (19) या विवाहितेने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता व आत्महत्या केली होती. ही घटना बुधवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुरुवारी नसीबा संजय तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 19 वर्षीय विवाहिता आरिफाबी शेख हिला माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता आणि याच जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती शेख जुबेर शेख नदीम, शेख आफताब शेख नदीम व अनिसाबी शेख नदीम या तिघांविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीरक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे.
