चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या : नराधम पतीला आठ वर्ष शिक्षा


Murder of wife over suspicion of character : Manslaughtering husband sentenced to eight years नंदुरबार (21 जून 2025) : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणार्‍या पतीला न्यायालयाने आठ वर्ष कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. राजू बाबूलाल सरपे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

शहादाच्या बुडीगव्हाण येथील राजू सरपे हा पत्नी बानूबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून तो तिला नेहमीच मारहाण करीत होता. 29 मे 2020 रोजी बानूबाई, राजू आणि त्यांचा मुलगा गोपाल असे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले असता तिथेही राजू याने बानूबाई हिला जबर मारहाण केली आणि साडीने गळा आवळला. या घटनेने घाबरलेला मुलगा गोपाल हा धावत गावात आला वडील आईला मारत असल्याचे सांगितले. गावातल्या लोकांनी बानूबाईचा भाऊ तथा फिर्यादी किशोर सोनवणे याला ही बाब सांगितली.




किशोर व इतर गावकरी घटनास्थळाकडे धावले असता तेथे बानूबाई ही जमिनीवर निपचित पडलेली आढळली. तिच्या गळ्याभोवती साडीचा पदर घट्ट आवळलेला आढळला. गावकरी आल्याचे पाहताच राजू याने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला गावकर्‍यांनी त्यास पकडले. बानूबाईला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याबाबत किशोर सोनवणे याच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात राजू सरपे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन सहायक फौजदार दिनेश भदाणे यांनी सखोल तपास करून पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. राजू अटकेनंतर कारागृहातच होता. याप्रकरणी शहादा येथील सत्र न्यायालयात खटला चालला. यात साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या. एस.सी. पठारे यांनी राजू सरपे यास आठ वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.आर.पी.गावीत यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सागर नांद्रे, हवालदार परशराम कोकणी, गणेश सावळे, देविदास सूर्यवंशी, शैलेंद्र जाधव यांनी काम पाहिले.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !