भुसावळातील भोरगाव लेवा पंचायतीचा पुढाकार : दुभंगलेली मने जुळून पुन्हा फुलला संसार


भुसावळ (23 जून 2025) : आधुनिक जीवनातील ताण-तणाव आणि व्यसनाधीनता यामुळे तुटण्याच्या मार्गावर असलेल्या एका संसाराला भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेच्या मध्यस्थीने वाचवण्यात यश आले आहे. आर्थिक सुबत्ता असूनही संसारात अवघ्या 14 महिन्यांत निर्माण झालेला तणाव यशस्वी समुपदेशाने कमी करुन तुटणार्‍या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
यावल तालुक्यातील सतीश (नाव बदलले आहे) आणि सावदा येथील नीशा (नाव बदलले आहे) यांच्या लग्नाला अवघे 14 महिने झाले होते. पुण्यातील एका चांगल्या कंपनीत कार्यरत असलेल्या सतीशसोबत नीशा पुण्यात स्थायिक झाली होती. आर्थिक सुबत्ता असूनही त्यांच्या सुखी संसारात दारूच्या व्यसनामुळे तणाव निर्माण झाला. सतीशला संध्याकाळी दारू पिण्याची सवय होती. सुरुवातीला नीशाने याकडे दुर्लक्ष केले, नंतर प्रेमाने, रागाने आणि भांडूनही समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तात्पुरता परिणाम होत असे. अखेर संयमाची मर्यादा संपल्याने नीशा माहेरी परतली. तीने भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. पंचायतीचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी हे प्रकरण समजून घेतले. यावर तोडगा काढता येऊ शकतो, अशी जाणीव झाल्याने त्यांनी इतर पंचांशी चर्चा करून सतीशला नोटीस पाठवली. सुनावणीच्या वेळी सतीश आणि नीशा समोरासमोर आले. समुपदेशानंतर व्यसन सोडण्यासाठी सतीशने होकार दिला. यावेळी सुभाष भंगाळे, संजय पाटील, अनिल वारके, शरद फेगडे, मंगला पाटील, कावेरी चौधरी, संध्या वराडे हे उपस्थित होते. भोरगाव लेवा पंचायतीने अशाप्रकारे तुटण्याच्या मार्गावर असलेले 10 संसार पुन्हा जुळवले आहेत, जे समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे.








व्यसनमुक्ती केंद्रात घेतले उपचार
भोरगाव पंचायतीचे पंच आणि सुहास चौधरी यांनी सतीशला व्यसन सोडण्यासाठी समजावले. सतीशने पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले, तर नीशाने संयमाने त्याला सहकार्य केले. सहा महिन्यांतच सतीशमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. नीशाचे भुसावळातील आरती चौधरी यांनी समुपदेशन केले. अखेरी, पंचांच्या साक्षीने आणि प्रयत्नांनी नीशाची साडीचोळीने ओटी भरून तिला आनंदाने सासरी पाठवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !