एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 33 मोबाईलसह चोरटा जाळ्यात


MIDC police’s big achievement : Thief caught with 33 stolen mobile phones जळगाव (23 जून 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे अट्टल मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. तरुण नोरसिंह गुजरिया (23, रा.इंदूर, मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे 33 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयीत ताब्यात घेताच चोर्‍यांचा उलगडा
शनिवार, 21 जून रोजी जळगावातील कासमवाडी परिसरात बाजार असल्याने पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, कॉन्स्टेबल रतन गीते यांना गस्तीवर पाठवल्यानंतर एक संशयित आरोपी तरुण आणि दोन अल्पवयीन मुलांवर संशय आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चार मोबाईल आढळले. मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली देत स्वामी नारायण मंदिराजवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतात जमिनीमध्ये एका पिशवीत आणखी मोबाईल पुरून ठेवल्याची कबुली दिली.








चार लाखांचे 33 मोबाईल हस्तगत
आरोपी तरुण गुजरीयाला सोबत घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने शेतातील एका झाडाजवळ जमिनीतून पुरून ठेवलेल्या पिशवीतील एकूण चार लाख नऊ हजार किंमतीचे 33 मोबाईल काढून दिले. हे सर्व मोबाईल शनिवारचा बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारांमधून चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली. जप्त 33 मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. रावेरचे अंमलदार महेश मोगरे हे त्या मोबाईलच्या शोधात एमआयडीसी येथे आले असता त्यांना रावेर ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण आठ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तपास पालिस नाईक हेमंत जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !