नवापूरातील घरफोडीची उकल : दिड लाखांचा मुद्देमाल जप्त

House burglary solved in Navapur: Property worth Rs 1.5 lakh seized नवापूर (24 जून 2025) : शहरातील शास्त्री नगर भागातील रहिवासी जयेश शंकर वसावे यांच्या घरातून 21 जून रोजी मध्यरात्री मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्याने एक लाख 52 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. नवापूर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अल्पवयीन संशयीताला ताब्यात घेतले. संशयीताने पालकांसमक्ष गुन्हा कबुल करीत मुद्देमाल काढून दिला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय पद्धत्तीने तपास केल्यानंतर एका अल्पवयीनाने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पालकांसमक्ष अल्पवयीनाची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दोन मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, घड्याळ मिळून एक लाख 52 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. तपास नवापूर पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे करीत आहेत.

यांनी केली गुन्ह्याची उकल
ही कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे नूतन पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, हवालदार अमोल जाधव, दिनेशकुमार वसुले, महिला नाईक भारती आगळे, शिपाई दिनकर चव्हाण, दिनेश बाविस्कर, संजय गावीत आदींच्या पथकाने केली.
