जळगावात दोन ट्रक धडकल्या : चालक जागीच ठार

Two trucks collided in Jalgaon: Driver killed on the spot जळगाव (24 जून 2025) : शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला.
चालकाचा जागीच मृत्यू
ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एका ट्रकमधील चालक कॅबिनमध्ये अडकल्याने दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

दुसर्या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर एमआयडीसी पोलिस व वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली.