भुसावळातील मुख्य बाजारातील अतिक्रमण अखेर हटवले
40 हजार स्वेअर फुट जागेवर फिरवला जेसीबी : हातगाडी व्यावसायीकांची होणार सोय

Encroachments in the main market in Bhusawal finally removed भुसावळ (5 जुलै 2025) : भुसावळ शहरातील आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ हॉकर्स बांधवांसाठी जागा देण्याच्या थंड बस्त्यात अडकलेल्या प्रक्रियेला पालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटवून गती दिली. 40 हजार स्केअर फूट जागेवर असलेले तीन ते चार फळांच्या व्यापार्यांचे पक्के शेड तसेच आठ ते दहा टपर्यांवर पालिकेने जेसीबी फिरवला.
नोटीसा बजावूनही अतिक्रमण कायम
पालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना पालिकेने पंधरवड्यापूर्वी नोटीस बजावल्या होत्या, यानंतरही अतिक्रमण कायम होते. बुधवारी सकाळी दहा वाजताच पालिकेचे जेसीबी व 60 कर्मचार्यांचा ताफा अतिक्रमणस्थळी पोचला. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटविल्यानंतर मोकळा श्वास घेतलेल्या या जागेवर आता 70 हॉकर्स बांधव तसेच उर्वरित किमान 100 पेक्षा अधिक हातगाडी व्यवसायीकांसाठी स्वतंत्र मार्केट तयार होणार आहे.

दुभाजकांच्या मुद्यामुळे मुहूर्त
बाजारातील रस्त्याचे काँक्रीटीकरण कामात होणार्या रस्ता दुभाजकाला 70 हॉकर्स बांधवांनी विरोध केला होता. दुभाजकामुळे त्यांच्या हातागाड्या लावण्यास अडचणी येणार होत्या. यानंतर मंत्री संजय सावकारेंसोबत झालेल्या बैठकीत हॉकर्स बांधवांना गणपती मंदिराजवळील जागेचे आश्वासन दिले. दुभाजकांचा मुद्दा समोर आल्याने अनेक वर्षांपासून असलेले हे अतिक्रमण अखेर निघाले.
स्वत:च अतिक्रमण हटवले
पालिकेने अतिक्रमीत जागेवर असलेल्या घाऊक फळविक्रेत्या अतिक्रमणधारकांना 18 जून रोजी नोटीस बजावली होती. अतिक्रमण 24 तासांत काढावे, अन्यथा जेसीबी चालवून अतिक्रमण काढण्याचा इशारा या नोटीसीतून देण्यात आला होता, मात्र यानंतरही अतिक्रमण धाारक हटले नाही. अखेर शुक्रवारी जेसीबी व पालिकेचा ताफा पोचल्यानंतर नुकसान टाळण्यासाठी काहींनी स्वत: अतिक्रमण हटवले.
पालिका देणार भोगवटा
मुख्य बाजारपेठेतील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या दरम्यान हातगाडीवरुन व्यवसाय करणार्या 70 हॉकर्स बांधवांना गणपती मंदिराजवळ जागा दिली जाणार आहे. यासाठी पालिकेने यापूर्वीच मोजमाप केले आहे. जागेचे वितरण करुन विक्रेत्यांना पालिकेचा भोगवटा, पक्के शेड,दिवे, पंखे, सीसीटिव्ही कॅमेरे आदींची सुविधा करुन दिली जाणार आहे.
हा फायदा होणार
मुख्य बाजारपेठ व मिरवणूक मार्गावर असलेल्या हॉकर्स बाधवांना गणपती मंदिराजवळ स्थलांतरीत होणार असल्याने आता मुख्य बाजारात सध्या असलेले अतिक्रमण थांबेल. रस्ता वाहतूकीसाठी सुटसुटीत होईल. हॉकर्स झोन एकाच ठिकाणी राहिल यामुळे ग्राहकांनाही सोयीचे होणार आहे. हॉकर्स बांधवांच्या हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी होणार नाही. हॉकर्स बांधवही हक्काच्या जागेत व्यवसाय करु शकतील.
यांनी केली कारवाई
पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख, नगर अभियंता पंकज मदगे, लेखापाल अय्युब तडवी, रचना सहाय्यक अंकुश गोसावी, कर निरीक्षक अजीत भट, कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा संदानशिव, संगिता बाक्षे आदींसह पालिकेच्या 70 कर्मचार्यांचे विविध पथकांनी ही कारवाई केली.
अतिक्रमण करणार्यांवर कारवाई निश्चित
पालिकेने अनेक वर्षांपूर्वीपासून असलेले अतिक्रमण हटवले आहे. या विक्रेत्यांचे यापूर्वीच बाजार समितीमध्ये गाळे आहेत. आता या जागेवर आगामी काळात निर्णय घेवून हॉकर्स झोन उभारला जाईल. यामुळे मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणही थांबेल. यापूढील काळात अतिक्रमणधारकांवर सातत्याने कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.
