भुसावळातील टवाळखोर पोलिसांच्या रडारवर : पहिल्याच दिवशी नऊ जणांवर कारवाई
महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत 9 जणांवर दामिनी पथकांचा झटका

Bhusawal’s thugs on police radar : Action taken against nine people on the first day भुसावळ (5 जुलै 2025) : शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालय परिसरात होणार्या टवाळखोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत 9 टवाळखोर युवकांवर दामिनी पथकाद्वारे महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. दामिनी पथकाकडून टवाळखोरांना दिलेल्या झटक्याने त्यांच्यात खळबळ उडाली आहे.
छेडखानी करणारे पोलिसांच्या रडारवर
महाविद्यालयाच्या बाहेर थांबून युवती दिसल्यावर टोमणे मारणे, मुलींची छेड काढणे, गॉगल लावून हिरोगिरी करणे ही कामे युवक करत होते. हे युवक 18 ते 20 वर्षे वयोगटातील असून शाळा आणि कॉलेज बाहेर उभे राहत मुलींना अश्लील टोमणे मारणे, गैरवर्तन करणे किंवा टपोरीपणा करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे दामिनी पथक व बाजारपेठ पोलिस पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
या पथकात पोलिस उपनिरीक्षक भारती काळे, हवालदार विजय नेरकर, महिला हवालदार सीमा आहिरे, भूषण चौधरी, परेश बिर्हाडे, प्रशांत सोनार व योगेश महाजन यांचा समावेश होता.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात निर्भया पथके कार्यरत असून शाळा-कॉलेज परिसरात साध्या वेशात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.मुलींची छेड काढणार्या,अश्लील वर्तन करणार्या टवाळखोरांवर तातडीने कारवाई केली जात आहे.
पोलिस विभागाकडून यासंदर्भात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून अशा टवाळखोरीच्या घटनांवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी ही मोहिम शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात सातत्याने राबवली जाणार आहे. असे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या आवारातून आणतात गाडीत
महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करणार्या युवकांवर कारवाई करण्याच्या एक तास अगोदर महिला व साध्या वेशातील पोलिस लक्ष ठेतात आणि त्यांच्यावर नंतर कारवाई करतात. संबंधित युवकांना पोलिस गाडीत पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या समोर मुलांना समज दिली जात असल्याचे बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.
