510 किमी सायकल चालवून गाठली पंढरी : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 14 सायकलपटुंचा अनोखा भक्तिभाव

भुसावळ (5 जुलै 2025) : जय जय राम कृष्ण हरीच्या जयघोषात भुसावळातील 14 सायकलपटुंनी तब्बल 510 किमी अंतर पार करत पंढरपूर वारी यशस्वीपणे पूर्ण केली. विठोबाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या ओढीने निघालेली ही वारी केवळ सायकल प्रवास नव्हता, तर ती श्रद्धा, सहकार्य आणि निसर्गप्रेमाचा अनोखा संगम ठरली.
विठ्ठल दर्शनाने वारीला सुरुवात
वारीची सुरुवात दीपनगर,भुसावळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन पहाटे विठोबाच्या नामस्मरणाने झाली. पुढे जळगाव, फर्दापूर, अजिंठा घाट, संभाजीनगर, मांजर सुभा घाट, भुममार्गे हा खडतर प्रवास करत त्यांनी पंढरपूर गाठलं. दोन दिवस 190 किमी आणि 137 किमीचे टप्पे पार करत, तिसर्या दिवशी शेवटचा 185 किमीचा टप्पा पूर्ण करत विठोबाच्या दर्शनाचा क्षण अविस्मरणीय ठरला.

या प्रवासात 24 किमी प्रति तास वेगाने समोरून येणारा वारा, 77% हेडविंड, तीव्र चढउतार आणि पावसाच्या सरींसह उन्हाच्या झळा – अशा निसर्गाच्या परीक्षा होत असतानाही पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा गजर प्रत्येकाच्या ओठांवर अखंड सुरु होता.संपूर्ण प्रवासात जळगाव सायकलिस्ट ग्रुपने भोजन, नाश्ता, हायड्रेशन, मेडिकल किट, सपोर्ट व्हेईकल्सची शिस्तबद्ध व्यवस्था केली.
पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय सायकल रिंगण सोहळ्यात हजारो सायकलिस्ट्सनी एकत्र येऊन सायकल चालवा – पर्यावरण वाचवाचा संदेश दिला. प्रदक्षिणा, भजन, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठोबाच्या पालखीची अनुभूती घेता घेता ही वारी भक्तिपूर्ण सोहळ्यात परावर्तित झाली. सदर वारीने सायकलप्रेम, आरोग्यदृष्टी, पर्यावरणप्रेम आणि विठोबाच्या चरणांशी आत्मिक नातं जोडण्याचा अनुभव दिला.
वारी संपली, पण विठोबाचं नामस्मरण आणि सायकलवरील भक्ती पुढच्या वर्षीही नक्की चालूच राहील, असा विश्वास सहभागी सायकलिस्ट्सनी व्यक्त केला.
यांचा वारीत सहभाग
या वारीत प्रवीण फालक, विद्याधर इंगळे, मधुकर इंगळे, मनोज चौधरी, गजानन पाटील, रवी पवार, सोमनाथ जाधव, विश्वनाथ पावरा, समीर चौधरी,जगदीश रेहपाडे, युवराज सूर्यवंशी, तुषार पोतरवार, मनोज कुमार भालेराव,भाऊसाहेब पाटील आदींनी सहभाग नोंदवला.