आमोदाजवळ लक्झरीला भीषण अपघात : आमदार अमोल जावळेंकडून घटनास्थळाची पाहणी


Terrible accident in luxury car near Amoda : MLA Amol Javale inspects the scene यावल (6 जुलै 2025) : भुसावळ रस्त्यावरील आमोदा गावाजवळ इंदोरवरून जळगावकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात घडल्याची घटना रविवारी पहाटे घडली होती. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 25 वर प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली व प्रवाशांची विचारपूस केली. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.

सा.बां.विभागाशी चर्चा
आमदार अमोल जावळे यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड व रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता यांचा सर्वांगीण आढावा त्यांनी घेतला.

या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या की – ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. अन्यथा याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिला.

या ठिकाणी अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात, त्यामुळे भविष्यातील दुर्घटनांना अटकाव करणे गरजेचे असल्याचे त्यांनी या प्रसंगी नमूद केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !