जादू टोण्याच्या संशयातून पाच जणांना जिवंत जाळले

Five people burned alive on suspicion of witchcraft पूर्णिया, बिहार (7 जुलै 2025) : महिलेवर जादूटोण्याचा संशय घेत संशयीतांनी महिला व तिच्या कुटुंबातील आणखी चार जणांना जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना बिहारमध्ये घडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्णिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीगंज पंचायतच्या टेटगामा, वार्ड क्रमांक 10 येथील पाचही जण रविवार रात्रीपासून रहस्यमय पद्धतीने बेपत्ता होते. बाबू लाल उरांव, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील इतर तीन सदस्यांना जिवंत जाळण्यात आल्याचे समोर आले आहे.
मृत बाबू लाल उरांव यांचा 16 वर्षीय मुलगा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. या भीषण हत्याकांडानंतर घराजवळील सर्व कुटुंबे आपल्या घरांतून पसार झाली आहेत. संपूर्ण गावात दहशत पसरली असून, भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील काही लोकांना बाबू लाल उरांव यांच्या पत्नीवर ‘डायन’ (काळी जादू करणारी महिला) असल्याचा संशय होता. याच संशयातून शेजार्यांनी रविवारी मध्यरात्री बाबू लाल उरांव, त्यांची पत्नी आणि तीन अन्य जणांना जिवंत जाळून ठार केल्याचा आरोप आहे.
पोलिस अधीक्षक स्वीटी सेहरावत यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. घटना घडत असताना, बाबू लाल उरांव यांचा मुलगा कसा तरी आपला जीव वाचवून पळून गेला आणि आपल्या आजीच्या घरी पोहोचला. त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली सर्व घटना आजीला सांगितली, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रत्यक्षदर्शी मुलाला घेऊन एसपी स्वीटी सेहरावत घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
पोलिस सध्या या प्रकरणावर काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मुफस्सिल पोलीस ठाण्याचे प्रमुख उत्तम कुमार यांनी या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मृतांची ओळख 70 वर्षीय मौसमात कातो देवी, 50 वर्षीय बाबूलाल उरांव, 40 वर्षीय सीता देवी, 25 वर्षीय मनजीत कुमार आणि 20 वर्षीय राणी देवी अशी पटली आहे. या घटनेमुळे पूर्णिया परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
