भुसावळात अतिक्रमणधारकांनी कारवाईपूर्वीच हटवल्या टपर्‍या, हातगाड्या


Encroachers in Bhusawal removed posts, handcarts before action was taken भुसावळ (8 जुलै 2025) : भुसावळातील पालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळा ते जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालय या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबवली. सकाळी नऊ वाजताच गांधी पुतळ्याजवळ अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा हजर झाल्याने हातगाड्यांसह रस्त्यावर टपर्‍यांचे अतिक्रमण, रस्त्यावर अडथळा ठरणारे फलक विक्रेत्यांनी स्वत:हून काढून घेतले. यामुळे गांधी पुतळा परिसर, यावलरोड, जामनेर रोडवर शुकशुकाट होता. पावसाळ्यातच पालिकेकडून राबविण्यात येणार्‍या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाळ्यात विक्रेते बेघर
पालिका प्रशासनाने गेल्या शुक्रवार, 4 रोजी मुख्य बाजारपेठेतील 40 हजार स्केअर फुटावरील जागेवर केलेले अतिक्रमण हटवले. यानंतर आता शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. या मोहिमेत सोमवारी पालिकेने गांधी पुतळा, महाराणा प्रताप चौक, सतारे लोखंडी बोगदा, छ. शिवाजी महाराज संकूल ते जामनेररोडवरील नाहाटा चौफुलीपर्यंतच्या भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिम हाती घेतली. सकाळी नऊ वाजता जेसीबी व पथक गांधी पुतळ्याजवळ हजर झाल्यानंतर विक्रेत्यांनी स्वत:च हातगाड्या, टपर्‍या हटवून घेतल्या. पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात अतिक्रमण काढले जात असल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.



सीओंनी पायी केली पाहणी
अतिक्रमण हटाव मोहिमेत मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी गांधी पुतळा परिसर, जामनेर रोडवरील भागात पायी जावून पाहणी केली. रस्त्यावर अडथळा ठरणार्‍या चार ते पाच फलक यावेळी जप्त करण्यात आले. तसेच विक्रेत्यांना यापूढील काळात रस्त्यांवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आजपासून इतर मार्गांवर कारवाई
अतिक्रमण हटाव मोहिम अजून तीन दिवस सुरू ठेवली जाणार आहे. मंगळवारपासून जळगावरोड, खडकारोड व यावलरोडचे अतिक्रमण काढले जाणार आहे. मात्र पालिकेने मोहिम जाहिर केल्याने या मार्गावरील टपर्‍या, हातगाड्या, अतिक्रमीत बांधकामे विक्रेत्यांनी काढून घेतली आहेत. पालिकेने मात्र न काढलेल्या अतिक्रमण निरस्त करण्याचा इशारा दिला आहे.

पक्क्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
पालिका प्रशासनाकडून रस्त्यावर पोट भरणार्‍या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले जात आहे, तर दुसरीकडे धनदांडग्यांच्या पक्क्या अतिक्रमणाकडे मात्र दूर्लक्ष होत आहे. शहरात पक्क्या अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे आहे. मात्र या अतिक्रमणांना प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना मात्र नाहक त्रास दिला जात असल्याच्या भावना विक्रेत्यांनी मांडल्या.

मॉडर्न रोडवर फलक ठेवून अतिक्रमण
शहरातील मुख्य बाजारात दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या स्टँडी फलक दुकानाबाहेर लावले आहेत. मॉडर्न रोडवर हा प्रकार सर्वाधिक आहे. या फलकाच्या आडून आपल्या दुकानातील सामान बाहेर ठेवून अतिक्रमण केले जाते. यामुळे पालिकेने या मोहिमेत रस्त्यावर लावलेले फलक जप्त करुन संबधीत दुकानदारांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

कारवाईत असेल सातत्य
रस्त्यावर अतिक्रमण करुन वाहतूकीस अडथळे निर्माण होतात. आगामी काळात या कारवाईत सातत्य ठेवणार आहे. यामुळे शहर सुव्यवस्थितीत राहिल. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई निश्चित होईल. आगामी काळात हॉकर्स बांधवांसाठी गणपती मंदिराजवळ जागा देणार असल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.

 

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !