‘गाईड’ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती
जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघात नाट्यरंग, जळगावचे प्रभावी सादरीकरण
The one-act play ‘Guide’ gave Bhusawalkar a spiritual experience भुसावळ (9 जुलै 2025) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल – रखुमाई यांच्या भेटीची ओढ घेऊन, अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्मिक अनुभूती देणार्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन शहरांमध्ये करण्यात येत असते. शहरातील नाहाटा महाविद्यालयात झालेल्या ‘गाईड’ या एकांकिकेने अशीच अनुभूती भुसावळकरांना दिली.
शहरातील जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांच्यावतीने नाहटा महाविद्यालय येथे नाट्यरंग, जळगाव या संस्थेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या एकांकिकेने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अमोल संगीता अरुण यांनी केले असून, या नाटकात सुहास दुसाने आणि अथर्व रंधे या कलावंतांनी प्रभावी संवादफेक व सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
एकांकिकेच्या तांत्रिक बाजूत पियुष भुक्तार यांचे पार्श्वसंगीत तर रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर यांनी केली होती.
पंढरपूरची वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य सांगणार्या या एकांकिकेची रंगमंच व्यवस्था दर्शन गुजराथी, कृष्णा चव्हाण, चंद्रकांत चौधरी आणि उमेश गोरधे यांनी प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, एकसंध टीमवर्क करत संपूर्ण सादरीकरण सुरळीत पार पाडले. एकांकिका पाहून पंढरपूर वारीला गेल्याचा अनुभव मिळाल्याचे प्रेक्षकांनी सांगितले.




