गुड्ड्या हत्या प्रकरणातील दोघा संशयीतांना धुळे शहरात प्रवेश बंदी


Two suspects in the doll murder case banned from entering Dhule city धुळे (9 जुलै 2025) : धुळे शहरातील गोपाल टी हाऊससमोर शेख रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्या (33, रा.गरुड कॉलनी, देवपूर, धुळे) याचा तलवार, कोयते तसेच गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. या हल्ल्यात गुड्ड्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी अटकेतील दोन संशयीतांना न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला मात्र आता या संशयीतांना धुळे शहरात प्रवेश करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.

काय घडले धुळे शहरात
18 जुलै 2017 रोजी सकाळी सव्वासहा वाजता धुळे शहरातील पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊससमोर गुड्ड्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी 18 संशयितांना अटक करुन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याखाली नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. यापैकी विजय गोयर ऊर्फ बडा पापा यास 17 जानेवारी 2025 रोजी आणि विक्रम ऊर्फ विक्की बाबा गोयर यास 23 जून 2025 रोजी औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.




दोघांना शहरात प्रवेश बंदी
दोन्ही हल्लेखोर नाशिक कारागृहातून धुळ्यात आले असता साथीदारांनी जोरदार स्वागत केले. यासंदर्भातील चित्रीकरण आणि छायाचित्रे समाज माध्यमात झळकल्यानंतर दोन्ही गुन्हेगारांना धुळे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.

या दोन्ही गुन्हेगारांनी न्यायालयातील खटल्यासाठी निश्चित केलेल्या तारखांशिवाय अन्य दिवशी धुळे शहरात प्रवेश करु नये, शहरात यायचे असेल तर त्यांना धुळे जिल्हा सत्र न्यायाधीशांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विजय गोयर ऊर्फ बडा पापा आणि विक्रम ऊर्फ विक्की गोयर हे शहरात कुठेही कुणाला दिसल्यास स्थानिक पोलिस ठाणे किंवा 112 या क्रमांकावर माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दोघांविरुध्द अनेक गुन्हे
पोलिसांच्या नोंदीत विजय आणि विक्रम गोयर हे दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत. दोघा संशयितांविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हत्या, दरोडा, चोरी, घरफोडी, दंगल, मारामारी, जिवे मारण्याचा प्रयत्न, कट रचणे किंवा दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विजयविरुद्ध विविध स्वरूपाचे 12 तर विक्रमविरुद्ध 17 गुन्हे दाखल आहेत.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !