मध्य रेल्वेत फुकट्यांची जत्रा : दोन लाख प्रवाशांकडून 20 कोटींचा दंड वसूल

कारवाईने उडाली खळबळ : कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा


Freebie fair on Central Railway: Fine of Rs 20 crore collected from two lakh passengers भुसावळ (10 जुलै 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने फुकट्या प्रवाशांविरूध्द तिकीट तपासणीची धडक मोहिम राबवित तीन महिन्याच्या काळात (एप्रिल ते जून) एक लाख 86 हजार 950 फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला. तिकीट तपासणीसांच्या विशेष पथकाकडून 20 कोटी 45 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विविध स्थानकांवर तपासणी मोहिम
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम ईति पांडे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक पी.के. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भुसावळ विभागात तिकीट तपासणी पथके नियुक्त केले होते. त्या पथकातील तिकीट निरीक्षकांनी धावत्या रेल्वे गाड्यासह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर थांबून तिकीट तपासणी करण्यात येत होती. यात पथकातील तिकीट तपासणीस यांनी व्यापक तपासणी मोहिम राबवून, बिना तिकीट प्रवास, अनियमीत तिकीट आणि प्रवास नियमांचे इतर उल्लघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात आली. एक एप्रिल ते 30 जून या काळात भुसावळ विभागाने 29 कोटी 19 लाख रूपयांचा रूपयांचा तिकीट तपासणीमधून महसूल मिळविला आहे. एकूण तीन लाख 25 हजार प्रकरणांमध्ये बिनातिकीट व अनियमीत प्रवास करणारे आढळून आले आहे.




असा केला दंड वसुल
विना तिकीट प्रकरणातून सुमारे 1 लाख 86 हजार 950 फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने 20 कोटी 45 लाख रूपयांचा दंड वसूल केला. तर अनियमीत प्रवासाची एकुण 1 लाख 38 हजार 500 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून 8 कोटी 72 लाख रूपयांचा दंड वसूल केला. तसेच बुकींग न करता सामान रेल्वेतून नेल्याने 370 प्रवाशांना दंड करीत त्याच्या कडून 1 लाख 8 हजार रूपयांचा दंड वसूल केला.

तिकीट काढून प्रवास करावा
प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करतांना रितसर तिकीट काढूनच प्रवास करावा, आरक्षण नसतांनाही आरक्षण डब्यातून प्रवास करणे नियमाने चुकीचे आहे. त्यामुळे अश्या प्रवाशांना दंड होऊ शकतो. त्यामुळे रितसर तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !