घटस्फोटानंतर पुन्हा जुळले नातं : भोरगाव लेवा पंचायतीच्या पुढाकाराने दाम्पत्याचे मनोमिलन
भोरगाव लेवा पंचायतीच्या ईतिहासाताच घटस्फोटानंतर मनोमिलनाची पहिलीच घटना
गणेश वाघ
Relationships restored after divorce : Couple reunited at the initiative of Bhorgaon Leva Panchayat भुसावळ (11 जुलै 2025) : तो आणि ती शिक्षीत, विचार, आचार जुळल्यानंतर दोघांचा बरोबर चार वर्षांपूर्वी धूमधडाक्यात विवाह झाला. राजा-राणीच्या संसाराला सुरूवात झाल्यानंतर दोघांच्या संसारवेलीवर फुलही उमलले मात्र पत्नी माहेरी जाते तसेच या ना त्या कारणावरून उभयतांमध्ये खटके उडाले व दोघांच्या मान्यतेने ते वर्षभरापूर्वी विभक्तही झाले मात्र वेळ गेली तसा रागही कमी झाला, दोघांनाच्या मनात मुलीच्या भविष्याचा विचार आला व दोघांनी आपापल्या चुका सुधारण्याची हमी घेत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अर्थात यासाठी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने पुढाकार घेतला व दोघांचे समुपदेशन केल्याने दोघांनी पुन्हा एकत्र येत नव्याने संसाराला सुरूवात केली.
आधी वाद, नंतर घटस्फोट समुपदेशनानंतर पुन्हा फुलला संसार
आसोद्याचे ज्ञानदेव आवसू ढाके यांची कन्या गायत्री व तरसोदचे हर्षल प्रकाश बोरोले यांचा समाजाच्या साक्षीने 6 फेब्रुवारी 2021 रोजी विवाह झाला व दोघांच्या संसारवेलीवर कन्या रत्न (युवाश्री) उमलले मात्र सुखी संसारात गैरसमजासह वादविवादाने वितुष्ट आणले. पत्नी वारंवार माहेरी जाते त्यावरून टोकाचे मतभेद वाढले. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 1 डिसेंबर 2024 रोजी भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेत या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला.



मात्र जशी वेळ गेली तसा राग कमी झाला. दोघांच्या मनात मुलीच्या भविष्याचा विचार आला आणि दोघांनीही आपापल्या चुका ओळखल्या. प्रेमाचे बंधन तोडणे शक्य नाही व बहरलेली संसारवेल पुन्हा फुलू शकते या विचाराने दाम्पत्य पुन्हा भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेत आले. शाखाप्रमुख सुहास चौधरी यांच्याशी सकारात्मक संवाद झाल्यानंतर तज्ज्ञ समुपदेशिका आरती चौधरी यांनी दोघांनाही भावी आयुष्यात कराव्या लागणार्या तडजोडीची कल्पना दिली. अखेरीस कुटुंबनायक ललित पाटील, सुहास चौधरी, आरती चौधरी, शरद फेगडे, आर.जी.चौधरी, सुभाष भंगाळे, संजय पाटील, कावेरी चौधरी या पंचाच्या साक्षीने साडीचोळीने ओटी भरून, अत्यंत प्रेमाने, चार समजूतीच्या गोष्टी सांगून विवाहितेची पाठवणी करण्यात आली व तत्पूर्वी 29 जून 2025 रोजी दोघांनी घटस्फोट रद्द केला व दुभंललेला संसार पुन्हा रूळावर आला.
गैरसमज मिटले अन् दाम्पत्याचे मनोमिलन घडले
सध्या हर्षल हे जळगावातील एका सुपरशॉपमध्ये जॉब करतात. पत्नी व मुलीच्या भविष्याच्या विचार करून त्यांनी एक पाऊल पुढाकाराचे उचचले तर पत्नीही झाले गेले विसरून नव्या दमाने आता संसार वेल फुलवण्याची जवाबदार उचचली आहे. झाले गेले विसरावे व जुने वाद नकोच म्हणून उभयंतांनी कुटुंबासाठी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच समाजासाठा कौतुकास्पद बाब आहे.
नात्यांनाही दुसरी संधी द्या : आरती चौधरी
समुपदेशक आरती चौधरी म्हणाल्या की, गैरसमजाची ठिणगी पडल्यानंतर दोघे विभक्त झाले मात्र मुलीच्या भविष्याच्या चिंतेने व योग्य वेळी केलेल्या समुपदेशानाने त्यांचा संसार पुन्हा बहरला आहे. नात्यांमधील समजूत, क्षमा, संवाद आणि प्रेम यांचे हे जिवंत उदाहरण आहे. समाजाला सांगणारी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे की, प्रेमात माफी असते, आणि नात्यांना दुसरी संधी द्यावी लागते. भोरगाव लेवा पंचायत, भुसावळ शाखेच्या इतिहासात घटस्फोट होऊन पुन्हा दाम्पत्याची फुललेली संसारवेल ही ईतिहासातील पहिलीच घटना आहे.





