यावल शहरात सर्वधर्मियांच्या सहभागाने निघाली पेहरन ए-शरीफ मिरवणूक


यावल (11 जुलै 2025) : यावल शहरात शहरात गुरूवारी सायंकाळी ‘पेहरन-ए-शरीफ’ ची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. नातेपाक धार्मिक गीत सादर करीत निघालेल्या या जूलूसमध्ये सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते. शहरातील सुर्दशन चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पेहरण मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी येथे नवस फेडले तर काहींनी डोली खालून निघतांना नवस मागितले.

शंभर वर्षांची परंपरा
यावल शहरातील उत्सवाला सुमारे 100 हुन अधिक वर्षांची परंपरा असुन उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेला हा उत्सव साजरा करतात. सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे ( पवित्र वस्त्र ) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी येथे हजेरी लावली होती. यावल शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी आणलेल्या बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांच्या पेहरन अर्थात तब्बरूक ( पवित्र वस्त्र ) यांची स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे मिरवणुक काढली जाते.




धार्मिक गीत गात मिरवणूक
या पवित्र वस्त्रांना सजवलेल्या डोलीत ठेवले जाते. व दरवर्षी त्यांची मिरवणूक काढण्यात येते. यास पेहरण ए शरीफ उत्सव म्हणतात. गुरूवारी शहरात बाबुजीपुरा मोेहल्ला समितीकडून उत्सव साजरा करण्यात आला यात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्यात आली. शहरातील डांगपुरा येथून सायंकाळी मिरवणुकीला सुरवात झाली. या उत्सवात हिंदू-मुस्लिमांसह सर्वधर्मीय बांधव एकत्र आले. यातून एकात्मतेचे दर्शन घडले तर मिरवणुकीपुर्वी अनेकांनी मानलेले नवसदेखील फेडले. येथे जिल्ह्यासह मुंबई, मालेगाव, बर्‍हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक दाखल झाले होते.

भाविकांनी बोलले नवस
पेहरन शरीफ मिरवणुक सुर्दशन चौकात दाखल झाल्यावर येथे विविध मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले तर मिरवणुकीत डोली खालून निघत अनेकांनी नवस मागितले. संपूर्ण उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष शेख नईम, उपाध्यक्ष मोहसीन खान, शेख शाहिर, सचिव निसरारूद्दीन, सह सचिव इरफान खान सह सदस्यांनी परिश्रम घेतले. उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त राखण्यात आला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !