भुसावळातील स्टेशन रोड आज मध्यरात्रीपासून बंद : समोर आले हे कारण !
अंतर्गत भागात रिक्षांना प्रवेश बंद : फेर्यांमुळे एसटीची तात्पुरती भाडेवाढ
Station Road in Bhusawal closed from midnight today : This reason has come to light ! भुसावळ (15 जुलै 2025) : शहरातील वर्दळीचा स्टेशन रोड मंगळवार, 15 रोजी मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर्सपर्यंत (रेल्वे वस्तू संग्रहालय) स्टेशन रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येणर असल्याने सुमारे दिड महिना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. असे असले तरी बसस्थानकाचे स्थलांतर होणार नाही. सर्व बसेस वरणगाव रोडने शहरात येतील.
प्रवाशांना भाडेवाढीची झळ : वरणगावमार्गें बसेस येणार शहरात
मंगळवारी मध्यरात्रीपासून स्टेशनरोड वाहतुकीसाठी बंद होणार आहे व यामुळे शहरातील जामनेर रोडवर येणार्या व जाणार्या तसेच यावल, रावेर, फैजपूर, बर्हाणपूरकडून येणार्या बसेस महामार्गावरुन वरणगावरोड मार्गे बसस्थानकात येणार आहेत.



हा रस्ता बंद झाल्यानंतर अंतर्गत भागातील व्ही. एम. वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, मॉडर्न रोडवरुन रिक्षांचा वापर वाढू शकेल पण हा रस्ता दुचाकी व पादचार्यांसाठी असल्याने यावरुन रिक्षा वाहतुकीला बंदी केल्याचे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांनी बैठकीत सांगितले.
रिक्षांना रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी उत्तरद्वाराचा वापर करावा लागेल तर बसस्थानकात जाण्यासाठी थेट महामार्गावरुन वरणगावरोड असे वापरावे लागेल. या बैठकीत नगरपालिकेचे अभियंता पंकज मदगे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक राकेश शिवदे, आगाराचे वाहतूक निरीक्षक पी.व्ही.पाटील, ठेकेदार आशिक तेली उपस्थित होते.
आज जळगावात भाडेवाढीसाठी बैठक
स्टेशनरोडच्या काँक्रिटीकरणाने बसेस महामार्गावरुन फेर्याच्या रस्त्याने बसस्थानकापर्यंत जातील. यामुळे एसटीची भाडेवाढ होईल. या संदर्भात किती किमी अंतर वाढेल याचे सर्वेक्षण करण्यात आले. मंगळवारी जळगाव येथे बैठक होऊन तात्पुरती भाडेवाढ जाहीर होईल, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी सांगितले.





