रेल्वे सुरक्षा बलाचा जागरूकपणा : ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत हरवलेला मोबाईल केला परत


भुसावळ (16 जुलै 2025) : रेल्वे प्रवाशांचे सामान हरवण्याच्या घटना वाढत असताना भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दल जळगावने एक स्तुत्य उदाहरण घालून दिले आहे. ‘ऑपरेशन अमानत’ मोहिमेंतर्गत आरपीएफने हरवलेला मोबाईल शोधून संबंधित प्रवाशाच्या नातेवाइकाच्या ताब्यात सुरक्षितरीत्या सुपूर्द केला.

10 जुलै रोजी भुसावळ कंट्रोल रूमकडून रेल मदद अंतर्गत माहिती प्राप्त झाली की, ट्रेन क्रमांक 22357 च्या एस-3 बर्थवर एका प्रवाशाचा मोबाईल विसरला गेला आहे. ही गाडी जळगाव स्टेशनला दाखल झाल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक मनोज सोनी यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित कोचची तपासणी केली. दरम्यान, त्यांना ओप्पो कंपनीचा गुलाबी रंगाचा मोबाईल सापडला. हा मोबाईल आरपीएफ कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला.


यानंतर काही वेळात प्रवाशाचे नातेवाईक जलगाव रेल्वे पोलिस ठाण्यात उपस्थित झाले. त्यांनी आपले नाव मो. जावेद मो. सिद्दीकी (वय 41), राहणार मुस्लिम कॉलनी, खडका, भुसावळ असे सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकाचा 13 हजार रुपये कींमतीचा मोबाईल गाडीमध्ये राहिला होता.

प्रवाशाने मोबाईलचे कीपॅड ओपन करून त्याचे मालकी हक्काचे स्पष्ट प्रमाण दिल्यानंतर आरपीएफकडून वैध ओळख व प्रक्रिया पूर्ण करून सहाय्यक उपनिरीक्षक एस. बी. चौधरी यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता मोबाईल सुपूर्द करण्यात आला.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या तत्पर आणि प्रामाणिक कार्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत रेल्वे पोलिस दलाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेचीही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली जात असल्याचे या उदाहरणावरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !