भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : युपीतील अट्टल चोरट्यांचे त्रिकूट जाळ्यात

Bhusawal Railway Protection Force takes major action : Trio of persistent thieves from UP caught भुसावळ (17 जुलै 2025) : भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन यात्री सुरक्षा आणिऑपरेशन अमानत अंतर्गत 15 जुलै रोजी केलेल्या कारवाईत तीन संशयीतांना अटक करीत एक लाख 20 हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, कागदपत्रे व इतर वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, दोन प्रवाशांचे हरवलेले साहित्यही परत करण्यात आले.
अशी झाली कारवाई
रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, शेख समीर शेख शाहिद (20, रा. गोसिया नगर, भुसावळ) याच्याकडून रिअलमी नार्झो कंपनीचा 11 हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याने 11 जुलै रोजी स्टेशन परिसरातून मोबाईल चोरीची कबुली दिली असून त्याच्यावर गुन्हा लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल आहे.

दुसर्या घटनेत रंजीत नरोत्तम रावत (वय 30, रा. बागबई, जि. ग्वालियर) याला संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात 128 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा संशयीतरित्या स्टेशन परिसरात फिरत होता. तर तिसर्या प्रकरणात सौरभ कुमार (वय 22, रा. कौरवा, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) याच्याकडून डेल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, तीन हजार रुपये रोख, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड असा एकूण मुद्देमाल अंदाजे 93 हजार रुपये हस्तगत करण्यात आला. त्याने गोवा एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली असून, त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑपरेशन अमानत अंतर्गत हेमंत संजु बावरे (रा. बुरहानपूर) याचा सात हजार रुपये किमतीचा बेग आणि आकाश सिंग (रा. जबलपूर) याचा पंधरा हजारांचा मोबाईल ओळख पटवून त्यांना परत देण्यात आला. या दोन्ही वस्तू आरपीएफ उपनिरीक्षक एस.जे.दुबे यांच्या उपस्थितीत पंचनाम्यानंतर परत करण्यात आल्या.
आरपीएफच्या या कार्यवाहीमुळे एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा चोरीचा व हरवलेला माल परत मिळाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी, निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
