नागपूर-नाशिक रोड दरम्यान विशेष अनारक्षित रेल्वेच्या दोन फेर्या
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

भुसावळ (18 जुलै 2025) : सणासुदीच्या काळात किंवा विशेष प्रसंगी रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर आणि नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 01206 ही विशेष अनारक्षित गाडी 23 आणि 24 जुलै रोजी नागपूर येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 5,30 वाजता नाशिक रोड स्थानकावर पोहोचेल.

त्यामुळे कमी वेळेत आणि थेट नाशिक रोडला पोहोचणे प्रवाशांना शक्य होणार आहे.मुंबईला जाणार्या प्रवाशांना ही गाडी सुविधाजनक आहे, नाशिक रोडवरून सकाळी असलेल्या पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा त्यांना मिळू शकते. तसेच कसार्यापर्यत बस, टॅक्सीने गेल्यास कसारा येथून लोकलने सुध्दा मुंबईत पोहोचता येते.
ही गाडी नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड येथे थांबणार आहे. या विशेष गाडीत एकूण 18 अनारक्षित डबे असतील. यामध्ये 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन एसएलआरडी डबे समाविष्ट असतील. यामुळे जास्तीत-जास्त प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे नागपूर आणि नाशिक रोड दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
