स्वच्छ सर्वेक्षणात भुसावळ पुन्हा पिछाडीवर : राज्यात 50 वा क्रमांक
गेल्या वर्षाच्या तुलनेत कामगिरी घसरली : यंदा राष्ट्रीय पातळीवर 441 वा क्रमांक

Bhusawal lags behind again in cleanliness survey: 50th position in the state भुसावळ (19 जुलै 2025) : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या देशभरातील शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षाच्या तुलनेत भुसावळ पालिकेचे रॅकींग घसरले आहे. गतवर्षी पालिकेने 50 हजार ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांमध्ये देशात 159 रॅकींग मिळवले होते. यंदा ते 824 शहरांमधून 441 वर पोहोचले तर गतवर्षी राज्यात पालिकेने 65 शहरांमधून 33 वा क्रमांक मिळवला होता. यंदा तो 50 पर्यंत वाढला आहे.
दिवसागणिक खालावतेय कामगिरी
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात भुसावळ शहराची कामगिरी दिवसागणीक खालावत आहे. शहरात निकषांची पूर्तता होत नाही. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेची पिछेहाट होत आहे. सन 2022 च्या स्वच्छ सर्वेक्षणात चार झोनमध्ये विभागणी करण्यात आल्यानंतर त्यात पालिकेचा राज्यात 19 क्रमांक होता मात्र गेल्या वर्षी चार झोनचा एक राष्ट्रीय स्तरावरील झोन तयार करण्यात आला होता. त्यात पालिकेला 159 वा क्रमांक मिळाला होता. गुणानुक्रमासह रॅकींगही पालिकेचे वाढले होते. शहरात यंदा नाईट स्विपींग (रात्रीची स्वच्छता), हागणदारीमुक्ती, कचरा संकलन व प्रक्रिया या निकषांचे गुण वाढले होते. मात्र यंदाच्या निकषांची पालिका पूर्तता करु शकली नसल्याने गुणानुक्रम घसरला आहे.

का मिळवता आले नाही यश
पालिकेने शहरात 378 कोटी रुपयांची भूमिगत गटारी, एसटीपी यंत्रणेची प्रभावी उपाययोजना अद्याप केली नाही. कचरा विलगीकरण प्रक्रिया अद्यापही राबवली गेली नाही. पालिकेला यंदाही जीएफसी स्टार रेटींग मिळाले नाही. तर गेल्या वर्षाप्रमाणेच ओडीफ्री ++ हे मानांकन आहे. त्यातही वाढ झाली नाही. सिटीझन फिडबॅकमध्येही शहर पिछाडीवर राहिले.
गुणानुक्रम कसा सुधारणार ?
भुमिगत गटारी व एसटीपी या गुण वाढविणार्या निकषांची पूर्तता करण्यासाठी शहरात दरडोई 135 लिटर पाणीपुरवठा होणे आवश्यक असते. मात्र सध्या अमृत योजना रखडल्याने या निकषांनुसार पाणीपुरवठा होत नसल्याने भुमिगत गटारी व एसटीपी योजना रखडली आहे. आगामी काळात अमॄत योजनेनंतर भुमिगत गटारी होऊन गुणानुक्रम वाढेल, अशी आशा आहे.
अशी राहिली गेल्या काळातील कामगिरी
2017 — 433
2018 — 69 (फास्टेट मुव्हर्स पुरस्कार)
2019 —-132
2020 — 69
2021 — 128
2022 —- 98
2023—-159
2024 – 441
10 हजार गुणांची परीक्षा
स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत सर्टिफिकेशन, सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस घटक आहेत. सर्टिफिकेशन या घटकात हगणदारीमुक्त शहर, कचरामुक्त शहर आदींसह विविध निकषांवर गुण दिले जातात. एकूण 10 हजार गुणांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांच्या कागदपत्रांच्या व प्रत्यक्ष पाहणीचा समावेश असतो. त्यात पालिकेने यंदा समाधानकारक कामगिरी केली नाही. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणाला पालिकेचे मानांकन घसरले.
कचरा विलगीकरण घरूनच व्हावे
पालिका प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. यातून सेंद्रीय खतांची निर्मिती होते. शहरातील गुणानुक्रम वाढविण्यासाठी घरातून निघणारा कचरा विलगीकरण करून मिळावा, यासाठी प्रबोधन केले जात आहे. नागरीकांनी घरातच दोन डस्टबीन ठेवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करून द्यावा. शहरात कचर्याचे स्पॉट कमी होत नाहीत, पालिकेचे 100 टक्के प्रयत्न आहेत, त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त सहभागही आवश्यक असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.
