शासकीय कार्यालयात दादागिरी : फैजपूरातील भाजपाचे माजी नगराध्यक्ष निलेश राणेंना ‘प्रवेशबंदी’

Nilesh Rane फैजपूर (20 जुलै 2025) : फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनाचा दरवाजा बंद दिसल्यास तो लाथ मारून तोडेल, अशी धमकीच फैजपूर येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी देत दादागिरी केल्याचा प्रकार अलीकडे समोर आला होता. राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले होते. या प्रकारानंतर फैजपूरचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी निलेश उर्फ पिंटू राणे यांना 19 जुलै ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत यावल व रावेर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एखाद्या पदाधिकार्याला थेट कार्यालयात येण्यास मज्जाव घालण्यात आल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहे. 19 जुलै ते 16 सप्टेंबरपर्यंत ही बंदी असणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण
बुधवार, 16 जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात राणे यांनी कथितरित्या असभ्य वर्तन केल्याने महसूल कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याआधी 15 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या दालनात त्यांनी चुकीच्या प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महसूल कर्मचारी संघटनांनी या प्रकारांचा निषेध करत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते.
आदेशानंतर खळबळ
राणे यांच्या कृतीनंतर उसळलेली संतापाची लाट पाहता प्रशासनाने त्यांना शासकीय कार्यालयात येण्यास मज्जाव केला आहे. बंदी कालावधीत राणे ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात आणि सुनावणीसाठी दूरध्वनी प्रणालीचा वापर करू शकतात. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना एक तासाची सवलत देण्यात येणार आहे.
हा तर माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न
मी लोकप्रतिनिधी असून जनतेच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांत जावेच लागते. मधुकर साखर कारखान्यासाठी मी लढा देत आहे आणि यावल तहसीलदारांच्या निलंबनासाठी पाठपुरावा करत आहे. त्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली. हा निर्णय संविधानातील माझ्या अधिकारांच्या विरोधात असून माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया निलेश उर्फ पिंटू राणे यांनी दिली.
