आगामी निवडणुकांचे पडघण : प्रशासनाकडून मतदान केंद्रांच्या माहिती संकलनाचे काम युद्ध पातळीवर
भुसावळ (21 जुलै 2025) : आगामी पालिका, जिल्हा परिषद, ग्राम पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ मतदार संघातील 316 मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर सुरू झाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक मतदार संघातील संबंधित तहसील कार्यालये आपापल्या क्षेत्रातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती, सोयीसुविधा आणि आवश्यक बदल या संदर्भात माहिती गोळा करत आहेत.
मतदान केंद्रावरील सुविधांची तपासणी
प्राथमिक माहितीनुसार, या प्रक्रियेत प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची तपासणी केली जात आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी रॅम्प आणि विद्युत पुरवठा, पुरेशा प्रकाशाची सोय, मतदान कक्षासाठी योग्य जागा आणि परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाचा भर हा जास्तीत जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावर असून, त्यामुळे मतदान केंद्रांवर उपलब्ध सुविधांचा दर्जा तपासला जात आहे. ज्या केंद्रांवर काही उणीवा असतील, त्या त्वरित दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच,शहरी आणि ग्रामीण भागातील मतदान केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे प्रस्तावही तयार केले जात आहेत.



यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज
आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे. या माहिती संकलनानंतर निवडणूक आयोगाला अंतिम अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतरच मतदान केंद्रांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदारांना सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांनी बीएलओ व संबंधित अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत दिल्यात.





