भुसावळातील स्टेशन रोडवरील कामांमुळे वाहतूक कोंडी : बाजारपेठेतील रस्ते जाम


भुसावळ (21 जुलै 2025) : शहरातील स्टेशन रोडवर सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांनी नागरिकांच्या, विशेषतः वाहनचालकांच्या नाकी नऊ आणले आहेत. या कामांमुळे स्टेशन रोडवरून होणारी प्रवासी वाहतूक आता शहराच्या बाजारपेठेतून वळली आहे. याचा परिणाम म्हणून, शहरातील नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेतील रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळत आहे.

वर्दळीच्या रस्त्यांवर कोंडीची डोकेदुखी
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. रिक्षा, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्याने पादचार्‍यांसाठीही रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. यामुळे स्थानिकांना आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढला असून, अनेकांना नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचावे लागत आहे.




सततच्या हॉर्नच्या आवाजांनी आणि वाहनांच्या धुरामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणातही वाढ झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक कर्मचारी तैनात करावेत आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बॅरेकेट दूर करून अनेक जातात कामाच्या रस्त्याने
बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरून बसस्थानक, रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग बॅरेकेट लावून बंद करण्यात आला आहे, मात्र, काही वेळा तेथील कामगार हा बॅरेकेट बाजूला करून नागरिकांना सोडत आहे, यामुळे अन्य नागरिक व मोटर सायकल स्वार सुध्दा याच बंद केलेल्या मार्गाने जायचा आग्रह धरतात यावरून वाद निर्माण होतो. यामुळे बॅरेकेट लावून उपयोग काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !