मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लीक केल्यास बँक खाते होईल रिकामे : भुसावळात पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे

Police Inspector Uddhav Damale भुसावळ (21 जुलै 2025) : आधूनिक युगात मोबाईल हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मात्र मोबाईल हाताळताना कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, यातून फसवणूक होवू शकते व प्रसंगी हॅकर्स आपल्या खात्यातील रक्कम पळवू शकतात त्यामुळे युवकांनी आपले पासवर्ड, आलेल्या लिंक ओपन करू नये, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव डमाळे यांनी येथे केले. शहर पोलीस स्टेशनतर्फे शहरातील टॅलेंट हंट क्लासेस व करिअर पॉईंट क्लासेस, येथे विद्यार्थ्यांसाठी जागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला असता ते बोलत होते.
विद्यार्थ्यांमध्ये केले प्रबोधन
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा योग्य वापर, वाहतूक नियम, महिला सुरक्षेची खबरदारी तसेच व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांना ओळखीचे नसलेले लिंक्स, अॅप्स, व मेसेजेस उघडण्याचे परिणाम, पर्सनल माहिती कोणाशी शेअर करू नये, सोशल मीडियावर सावधगिरी कशी बाळगावी याची माहिती देण्यात आली.

सोशल मीडिया हे आत्मप्रकाशनाचे साधन नसून जबाबदारीचे माध्यम असल्याचेही सांगण्यात आले. या वेळी पोलीस अधिकार्यांनी शिक्षक व क्लासेस स्टाफशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांशी नियमित समन्वय साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास दोन्ही क्लासेसचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
