गुरांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार बंद : यावलला शेतकर्यांचे निवेदन
यावल (21 जुलै 2025) : यावल तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात शहर व तालुक्यातील गुरांच्या व्यापार्यासह शेतकर्यांनी एकत्र येत सोमवारी निवेदन दिले. बाजार समितीच्या आवारात रीतसर आजपावेतो गुरांचा व्यवहार व्यापारी वर्ग शेतकर्यांच्या माध्यमातून करत होते मात्र बाजारातून गुरे शेतकर्यांच्या खेड्यापाड्यावर नेतांना रस्त्यात होणारी अडवणूक, तथाकथित गोरक्षकांकडून होणारी मारहाण याला कंटाळून बाजार समितीत होणारा हा गुरांचा व्यापार बंद करण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला असून यापुढे जोपर्यंत गोवंश वाहतूक कायदेशीर परवानगी मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
अशा आहेत मागण्या
यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे तसेच यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे यावल शहर व तालुक्यातील गुरांचे व्यापारी आणि शेतकरी यांनी जाकीर खान सलीम खान, आसिफ खान आबिद खान, साहिल खान आमिर खान, मुजफ्फर खान साबीर खान, शकील खान निसार खान या व्यापार्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, यावल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार किनगाव तसेच पाडळसे आणि फैजपूर येथे गुरा-ढोरांचा बाजार भरतो, यात गुरांचे व्यापारी भाग घेतात व तेथे शेतकर्यांचे गोवंश सह इतर जनावारांच खरेदी विक्रीत दलाल म्हणून ते कार्य करत असतात व गुरा-ढोरांची खरेदी विक्री केल्यानंतर ही जनावरे संबधीत व्यक्ती खेडोपाडी घेऊन जात असतात. मात्र, आता गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यात तथाकथित गोरक्षकांकडून वाहन अडवणे, त्यांना शिवीगाळ करून मारहाण करणे, पैसे व मोबाईल हिसकवणे असे प्रकार घडत आहे.



सोबतचं वाहन पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुरांचे खरेदी-विक्रीचे सर्व पुरावे असताना देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच व्यापार्यांना देखील वेढीस धरले जाते. तेव्हा या मुळे व्यापारी सह वाहन धारकांना प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. म्हणुन या प्रकाराला कंटाळून गुरांच्या व्यापार्यांनी जोपर्यंत गुरेढोरे वाहतूक करण्यासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी व कायदेशीर संरक्षण दिले जात नाही तोपर्यंत गुरांचे व्यापारी कोणताच व्यापार करणार नाही अशी भूमिका गुरांच्या व्यापार्यांनी व शेतकर्यांनी घेतली आहे.
निवेदनावर दिवाकर पाटील, गणेश साळुंखे, राजू चौधरी, कृष्णा तायडे, सय्यद रशीद सय्यद निसार, इरफान खान दाऊद खान, जाबीर खान शौकत खान, अयाज खान, करीम खान चिरागोदिन सह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.