पुण्यात हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर कारवाई : आमदार खडसेंच्या जावयासह दोन महिला, तीन पुरुषांना अटक


पुणे (27 जुलै 2025) : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायप्रोफाईल रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी कारवाई करीत दोन महिलांसह तीन पुरूषांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या रेव्ह पार्टीत माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रॅडीसन हॉटेलच्या मागे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. बनसोडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या या गेस्ट हाऊसवर पार्टी सुरू असताना कारवाई करण्यात आली. यावेळी मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थांचे सेवन करत होते. पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.




पार्टीत खडसेंच्या जावयाचा समावेश?
या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये एका महिला आमदाराच्या पतीचा आणि एकनाथ खडसेंच्या जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवळकर यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रसिद्ध बुकी निखील पोपटानी याचेही नाव यात जोडले जात आहे, त्यामुळे या कारवाईने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

षड्यंत्र असल्यास समोर यावे : आमदार खडसे
एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार खडसे म्हणाले की, हे होणारच होतं हे मला माहीत आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाहीत. त्यांच्यावर दबाव असू शकतो. जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे मात्र मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलणार्‍यांपैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू आहे. त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही. यामध्ये षडयंत्र असल्यास समोर आले पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !