भुसावळात बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील बोगदा आज मध्यरात्रीपासून 20 दिवस बंद

रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण : वाहतुकीत मोठा बदल : जामनेररोडकडून स्टेशनवर जाणारी लहान वाहने जुना सतारा भागातून धावणार


The tunnel in front of Bazarpet police station in Bhusawal will be closed for 20 days from midnight today भुसावळ (27 जुलै 2025)  : शहरातील मुख्य वाहतूक मार्ग असलेल्या स्टेशन रोडचे काँक्रिटीकरण सध्या सुरू असून त्याचाच पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणून बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील चौकाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. परिणामी शनिवार, 27 जुलैच्या रात्रीपासून पुढील 20 दिवस या चौकातील तीन्ही बोगदे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. या दरम्यान शहरात वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी नवीन मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. रस्त्याच्या कामामुळे गवळीवाडा, मामाजी टॉकीज मार्गावरून ऐकेरी वाहतूक, जामनेररोडकडून स्टेशनवर जाणारी लहान वाहने जुना सतारा भागातून वळविण्यात आल्या आहे.

20 दिवस बोगदा बंद
पोलिस ठाण्यासमोरील चौकाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. तब्बल 20 दिवस या बोगद्यातून वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होतील. रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवासी, रेल्वेच्या विविध कार्यालयांमध्ये जाणारे कर्मचारी यांनाही अडचणींना तेाड द्यावे लागणार आहे. यामुळे 20 दिवस होणारी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने नियोजन केले आहे. वाहतुकीच्या मार्गाला बंद करण्यात येणार असल्याने या मार्गावरून नित्याने येणार्‍या-जाणार्‍या मार्ग बदल होणार आहे, यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे.




प्रवाशांना मोठा मनस्ताप
पोलिस ठाण्याजवळील रस्ता अत्यंत अरुंद आणि गजबजलेला आहे. सततची वाहतूक आणि पावसामुळे येथील रस्ता खराब झाला होता. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे आवश्यक ठरले. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तीन बोगदे असल्याने त्यांचाही समावेश कामात केला जाणार आहे. हे बोगदे बंद झाल्याने रेल्वे स्थानक, बाजारपेठ, आयुध निर्माणी, पीओएच, डीआरएम कार्यालय आणि बसस्थानकाकडे ये-जा करणार्‍या प्रवाशांना याचा मोठा परिणाम भोगावा लागणार आहे.

वाहतुकीचे नियोजन करून पर्यायी मार्ग निश्चित
या मार्ग बंदीमुळे वाहतुकीचा गोंधळ टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पर्यायी वाहतूक व्यवस्था निश्चित केली आहे, यात यावल / रावेर रोडवरून जामनेर रोडकडे जाणारी वाहने ही गवळी वाडा, दगडी पूलाखालून जामनेर रोडकडे जाणार आहे, तसेच जामनेर रोडवरून यावल रोडकडे येणारी वाहने ही पांडुरंग टॉकीज, दगडी पूलाखालून मामाजी टॉकीज मार्गे गांधी पुतळा यावल रोडवर येणार आहे, या दोन्ही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू राहील, त्यामुळे वाहनधारकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवावे, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे.

रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालयांसाठी विशेष रस्ता
जामनेर रोडकडून रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या मोटरसायकल व रिक्षांसाठी जुना सतारा भागातील रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. या वाहनधारकांनी कॉसमॉस बँकेसमोरील रस्त्याने जात हंबर्डीकर चौक तेथून रेल्वे स्थानक, डीआरएम कार्यालय,आयुध निर्माणी,पीओएच, एमओएच या ठिकाणी जावे लागेल. हा मार्ग फक्त दुचाकी व रिक्षा यांच्यासाठी खुला आहे. मोठ्या वाहनांना प्रवेश राहणार नाही.

बाजारपेठेतून वाहन आल्यास कारवाई
रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून प्रवासी घेणार्‍या रिक्षा या खडका रोड व रजा टॉवरमार्गे वळवण्यात आल्या आहेत. जर या रिक्षा पुन्हा बाजारपेठेमार्गे आल्या, तर त्यांच्या चालकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. या भागात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तैनात असतील.वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

व्यावसायीकांनी रस्ता मोकळा ठेवावा
रस्त्याच्या कडेला दुकानांसमोरील साहित्य, जाहिरातीचे फलक, फर्निचर ठेवून वाहतूक अडथळा करणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध कारवाई होणार आहे. वाहतूक शाखा असे साहित्य जप्त करणार आहे. व्यावसायिकांनी आपले साहित्य दुकानाच्या हद्दीत ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शाळकरी, कामकाज करणार्‍यांसाठी त्रासदायक ठरणार
या रस्त्यावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, रिक्षा व खासगी गाड्यांद्वारे शाळांमध्ये जातात. तसेच रेल्वे स्टेशन, आयुध निर्माणी व इतर कार्यालयात काम करणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना देखील पर्यायी मार्गांमुळे वेळेची अडचण निर्माण होणार आहे.

वाहनधारकांनी सहकार्य करावे, पोलिसांचे आवाहन
वाहतूक मार्गात बदल झाल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस गोंधळ होईल. मात्र नागरिकांनी संयमाने वागावे. पोलिसांशी वाद घालू नये. नियम पाळावेत. लवकरच काम पूर्ण करून मार्ग पूर्ववत सुरू केले जातील, असे वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !