भुसावळात नूतन डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार
New DRM Puneet Agarwal takes charge in Bhusawal भुसावळ (31 जुलै 2025) : भारतीय रेल्वेच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सेवेतील 1996 बॅचचे अधिकारी पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मावळत्या डीआरएम इती पांडे यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार घेतला.
या पदावर येण्यापूर्वी अग्रवाल हे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (प्रतिनियुक्त) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय सेवेला प्रकल्प व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन, कॉर्पोरेट व्यवहार, लॉजिस्टिक्स व मालवाहतूक, शहरी परिवहन, हरित ऊर्जा, रेल्वे ऑपरेशन्स आणि कायदे या विविध क्षेत्रांतील सखोल अनुभवाची मोठी साथ लाभली आहे.

रेल्वे सेवेतील त्यांच्या योगदानात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पार पाडलेल्या विविध महत्त्वाच्या जबाबदार्यांचाही समावेश आहे. प्रकल्प राबविण्याचे वेळापत्रक, अंमलबजावणी यासारख्या तांत्रिक बाबींमध्ये त्यांचा विशेष अभ्यास असून, कार्यक्षमता व गुणवत्ता सुधारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भुसावळ विभागात त्यांच्या नेतृत्वाखाली आधुनिकीकरण, परिणामकारक सेवा आणि प्रगती साधली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नवीन डीआरएम पुनीत अग्रवाल यांचा परिचय
1996 बॅच, भारतीय रेल्वे इलेक्ट्रिकल सेवा
एनएचएसआरसीएलमध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
डीएफसीसीआयएलमध्ये विविध प्रकल्पांत नेतृत्व
रेल्वे ऑपरेशन्स, हरित ऊर्जा, कॉर्पोरेट कायदे यातील विशेष कार्यानुभव




