भुसावळ शहरात उद्या नवरत्नांचा सन्मान सोहळा
आयोजकांकडून तयारी पूर्ण : श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांचा ‘विशेष सेवा गौरव’ पुरस्काराने होणार सन्मान
भुसावळ (1 ऑगस्ट 2025) : उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीदवाक्य घेवून कार्यरत ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी चार वाजता वांजोळा रस्त्यावरील स्टार लॉनमध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आयोजकांकडून सोहळ्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली असून शेकडो वाचक व भुसावळसह जिल्ह्यातील लाडक्या लोकप्रतिनिधी व प्रमुख शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत होणार्या या सोहळ्याकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वर्धापनदिनानिमित्त यंदापासून ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘विशेष सेवा गौरव’ तसेच ‘भुसावळ भूषण गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.

‘यांचा नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्काराने होणार सन्मान’
विविध क्षेत्रातील सेवाव्रतींचा प्रसंगी गौरव होईल. त्यात आरोग्य- प्रवीण फालक, सामाजिक- सोनू मांडे, वैद्यकीय- डॉ.सांतनूकुमार साहू, महिला सबलीकरण- रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक) प्रेरणा देशमुख, भाषा अभ्यासक- प्र.ह.दलाल, महिला समुपदेशन- भारती रंधे-म्हस्के, शैक्षणिक- प्राचार्य अनघा पाटील, सांस्कृतिक- गणेश फेगडे यांचा समावेश आहे.
‘विशेष सेवा गौरव सन्मान’
भुसावळचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व विद्यमान श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचा ‘विशेष सेवा गौरव सन्मान’ मान्यवरांच्या हस्ते होईल.
‘भुसावळ भूषण पुरस्कार’
भुसावळ शहरातील एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी नूर फातेमा मणियारचा निबंध लेखन स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अलीकडेच सन्मान केला. या विद्यार्थिनीच्या कार्याची दखल घेत तसेच बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींगमध्ये गोल्ड मेडल पटकावणार्या तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ) व बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेल्या तसेच राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार पटकावणार्या डॉ.जगदीश पाटील, आरोग्य दूत म्हणून काम करणार्या भुसावळातील मयूर अंजाळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘भुसावळ भूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात येईल.
या मान्यवरांची ‘वर्धापनदिन विशेषांक’ प्रकाशनासाठी उपस्थिती
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अमळनेरच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, भुसावळातील ताप्ती एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्तीचे चेअरमन महेश फालक, भारतीय महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, जळगाव लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील, सक्षम कौन्सीलिंग सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती चौधरी तसेच प्रशासनातून विशेष उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी आदींची उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास खान्देशातील वाचकप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ चे संपादक अमोल देवरे व कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी केले आहे.




