सोबत धावून साजरा केला मैत्री दिवस : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम


भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा सर्वत्र मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस एकत्र धावण्याचा सराव करीत असतात. त्याशिवाय हे सर्व पुरुष व महिला धावपटू देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सोबत सहभागी होत असतात. साहजिकच या सर्व धावपटूंमध्ये मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत झालेले आहे. रविवारी मैत्री दिवस असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने या सर्व धावपटूंनी मैत्री दिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी नियोजित केल्याप्रमाणे आपल्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत समूहाने एकत्र हे सर्व धावपटू दहा किलोमीटर अंतर धावले.

त्यासाठी हे सर्व धावपटू पहाटे 5.15 वाजता रेल्वे क्रीडांगणासमोरील श्रीकृष्णचंद्र सभागृहाच्या शेजारील जागेत जमले होते. सर्वप्रथम सर्वांनी वॉर्म अप केले. त्यानंतर आरपीडी रस्त्यावर दहा किलोमीटर अंतर या धावपटूंनी एकत्र धावायला सुरुवात केली. सुरुवातीला हवामानात असलेली आद्रता धावपटूंची कसोटी बघत होती. यावेळी या सर्व धावपटूंनी अतिशय निर्धाराने आपली धावणे पूर्ण केले व त्यानंतर मैदानावर परतल्यानंतर सर्व धावपटूंनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज देखील पूर्ण केली.


मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वच महिला धावपटूंनी आपल्या मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड आणलेले होते. अगदी सकाळपासूनच या सर्व महिला धावपटूंच्या चेहर्‍यावर त्यामुळे वेगळा आनंद होता. मैत्रीचे हे धागे बांधताना सर्व धावपटू एकमेकांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देत होते व पुढील सर्व मॅरेथॉन आपण सोबत जाऊ व खूप चांगल्या वेळेत ती मॅरेथॉन पूर्ण करू असे आश्वासन देखील एकमेकांना यावेळी देत होते.

यांचा उपक्रमात सहभाग
या उपक्रमात स्वाती व प्रवीण फालक, सरला व महेंद्र पाटील, पुष्पा व संजय तिवारी या दांपत्यांनी एकत्र धावून पती-पत्नीचे नाते देखील मैत्रीचे असले पाहिजे अशा आपल्या कृतीतून दाखवून दिले. सारंग चौधरी, मंगेश यावलकर, प्रशांत चौधरी, डॉ निर्मल बलके, दर्शन नागदेव, राजीव यादव, राजेंद्र ठाकूर, हर्षल लोखंडे, गणसिंग पाटील, प्रविण पाटील, रमेशसिंग पाटील, सुधीर पाचपांडे यांनी देखील एकत्रित 10 किमी अंतर पूर्ण केले.

महिलांमध्ये डॉ.चारुलता पाटील, माधुरी चौधरी, एकता भगत, मंगला पाटील, संगीता चौधरी, स्वाती भोळे, जयश्री चौधरी, मनीषा सिंग, रीना परदेशी, सुनिता वाघमारे, सीमा वायकर, चंपा जांगीड, गुड्डी देवी, जयश्री तिकोडकर, विजया निकम, मंजुषा कुलकर्णी, रेवती मांडे या मैत्रिणींनी एकत्रित होऊन दहा किलोमीटरचे अंतर अगदी आनंदात धावून पूर्ण केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !