भुसावळात पालिका प्रशासनाकडून मिळणार वातानुकूलित शववाहिनी सुविधा
अग्निशमन यंत्रणेत आपत्तीकालीन यंत्रणेसाठी वाहन
Bhusawal will get air-conditioned hearse facility from the municipal administration. भुसावळ (5 ऑगस्ट 2025) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालिकेला दोन वातानुकूलीत शववाहिनी तसेच महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अग्निशमन रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. या वाहनांचे लोकार्पण सोमवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील खासगी किंवा शासकिय रुग्णालयात मृत पार्थिव या शववाहिनीव्दारे इतर ठिकाणी पाठवता येणार आहे. शहरात यापूर्वी या प्रकारे पालिका किंवा शासकिय स्तरावरील सेवा नव्हती. या सेवेमुळे दिलासा मिळणार आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत लोकार्पण
शहरात पालिकेला महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दोन वातानुकूलीत शववाहिनी मिळाल्या आहेत. सोमवारी शासकिय विश्रामगृहात मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते या सेवेचे लोकार्पण झाले. यासोबतच राज्य शासनाच्या आपत्ती नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या रेस्क्यु व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले, अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी प्रशांत भोळे, गजेंद्र जावळे, मनोज बियाणी, गिरीष महाजन, परिक्षीत बर्हाटे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शहरात दुर्देवाने मृत्यू झालेल्यांचे शव इच्छीत स्थळी पोचविण्यासाठी खासगी शववाहिनी किंवा ब्युलन्सचा वापर केला जात होता. शहरात रेल्वे तसेच आयुध निर्माणीमुळे परप्रांतीयांचा रहिवास आहे. यामुळे दुर्देवाने मृत्यू झालेल्याचे पार्थिव दुरवर देण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. आता पालिकेच्या माध्यमातून वातानुकूलीत शववाहिनीची सेवा मिळणार असल्याने मृतांच्या नातेवाईकांना काही अंशी का असेना दिलासा मिळेल, असे यावेळी बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. शहरात ही सेवा योग्य पध्दतीने राबवली जाईल, असेही ते म्हणाले.
अल्प दरात मिळेल सुविधा
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही सुविधा अल्प दरात दिली जाणार आहे. मृत पार्थिव पोहचविण्याचे अंतराचा हिशोबाने इंधन खर्चात ही सुविधा मिळणार आहे. या वाहनांवर पालिका प्रशासनाकडून चालक उपलब्ध करुन दिले जातील. दूर अंतरावरही कमी खर्चात पार्थिव पोहचवता येणार आहे.




