रुईखेडे विद्यालयात मासिक पाळी स्वच्छता व नियोजनावर कार्यशाळा
रुईखेडा, ता.मुक्ताईनगर (6 ऑगस्ट 2025) : मंदाबाई महादू नारखेडे विद्यालयात मासिक पाळी व स्वच्छता नियोजनावर कार्यशाळा झाली.
मुलींच्या जीवनातील मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असूनही, आजही अनेक ठिकाणी तिच्याभोवती गैरसमज, लाज आणि अज्ञानाचं सावट आहे. यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये भीती, न्यूनगंड, आरोग्याच्या समस्या आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो या कारणास्तव कार्यशाळा झाली.

अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.जे.पाटील होते. प्रमुख मार्गदर्शिका योगीता झांबरे व बबिता तडवी होत्या. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मुलींना मासिक पाळीच्या काळात येणार्या शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांची माहिती योग्य पद्धतीने देणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.
मासिक पाळी सुरू होणे हे मुलीच्या शारीरिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. परंतु अनेक मुलींना या बदलांची पूर्वकल्पना नसल्यामुळे पहिली पाळी ही त्यांच्यासाठी धक्कादायक ठरते. कार्यशाळेमध्ये शरीरात होणार्या नैसर्गिक बदलांबाबत वैज्ञानिक व संवेदनशील पद्धतीने माहिती देण्यात आली.
यामध्ये हार्मोन्समुळे होणारे बदल, पाळीचे चक्र प्रक्रियेची प्राथमिक माहिती दिली गेली. या सगळ्यामुळे मुलींना आपल्याच शरीराशी संवाद साधता आला आणि त्यांच्या मनातील भीती दूर झाली.
पाळीच्या काळात योग्य स्वच्छता न राखल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कार्यशाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर याचा वेळोवेळी बदल, वापरलेले नॅपकिन योग्यरीत्या टाकणे, शरीराची स्वच्छता, आतडे व बाह्य जननेंद्रियांची निगा राखणे या बाबतीत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच, काही मुली अजूनही पारंपरिक पद्धती वापरत असल्याने त्यांना त्या पद्धती सुरक्षित असतील तर स्वच्छ ठेवण्याच्या उपाययोजना सांगण्यात आल्या.
मार्गदर्शिकांनी मुलींना समजावले की, पाळी ही महिला शरीराची शक्ती आणि सर्जनाची खूण आहे. त्यात लपवून ठेवण्यासारखे काहीच नाही. आत्मभान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे विचार विद्यार्थिनींना खूप प्रेरणादायी वाटले.
मुलींनी मासिक पाळीच्या काळात शाळा बुडवू नये, शारीरिक अस्वस्थता असेल तर पालक-शिक्षकांशी मोकळेपणाने बोलावे, या गोष्टींचाही विचार या कार्यशाळेमध्ये करण्यात आला. सॅनिटरी नॅपकिन उपलब्धता, शाळेत योग्य सुविधा व गरज असल्यास विश्रांतीची सोय यावरही चर्चा झाली.




